पवारांसाठी राज ठाकरे `बच्चा`?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवर काहीही प्रतिक्रिया देण्यासा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नकार दिलाय.

शुभांगी पालवे | Updated: Jan 8, 2013, 11:33 AM IST

www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवर काहीही प्रतिक्रिया देण्यासा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नकार दिलाय. लहान मुलांच्या बालीश वक्तव्यांवर काय बोलणार, असं म्हणत पवार यांनी राज ठाकरेंचा विषय सरळसरळ उडवून लावला. ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.
‘तोचि बिहारी ओळखावा’ म्हणत राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी दिल्ली गँगरेप घटनेतील आरोपीही बिहारचेच असल्याचं सांगत परप्रांतियांवर हल्लाबोल केला होता. ‘त्या मुलीबाबत सहानभुती आहे वाईटपण वाटतं, पण खोलात न जाता फक्त बलात्कार, बलात्कार अशी ओरड होते, पण बलात्कार करणारे कोण होते कोण? बिहारीच ना!’असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या याच वक्तव्यावर शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारल्यावर पवारांनी पत्रकारांचीच फिरकी घेतली. ‘उद्या तुम्ही उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य काही बोलला की त्यावरही प्रतिक्रिया द्यायला सांगाल का?’असा उलटप्रश्नच पत्रकारांना विचारला.

राजकारण्यातल्या खेळातला जुना खेळाडू असलेले शरद पवार राज ठाकरे यांना खरोखरच राजकारणातलं प्यादं किंवा कच्चा लिंबू समजतायत की हे सगळं फक्त दाखवण्यासाठी हे लवकरच कळेल. आता तर असंच म्हणावं लागेल `२०१४ अब दूर नही!`