गर्भश्रीमंतांपैकी अंबानी नव्हे अझिम प्रेमजी दानशूर

देशातील श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्तींची यादी आपण दरवर्षी पाहतोच. पण आता तुमच्यासमोर एक वेगळी यादी सादर करीत आहे. गर्भश्रीमंतांच्या दातृत्वाची यादी. दान करण्यात यंदा बाजी मारलीय ती अंबानींनी नव्हे, तर विर्पो समूहाचे प्रमुख अझिम प्रेमजी यांनी.

Updated: Jan 6, 2015, 05:09 PM IST
गर्भश्रीमंतांपैकी अंबानी नव्हे अझिम प्रेमजी दानशूर title=

मुंबई : देशातील श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्तींची यादी आपण दरवर्षी पाहतोच. पण आता तुमच्यासमोर एक वेगळी यादी सादर करीत आहे. गर्भश्रीमंतांच्या दातृत्वाची यादी. दान करण्यात यंदा बाजी मारलीय ती अंबानींनी नव्हे, तर विर्पो समूहाचे प्रमुख अझिम प्रेमजी यांनी.

साबणापासून ते कॉम्प्युटरपर्यंत. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात व्यापून राहिलेल्य़ा विप्रो उद्योगसमूहाची ओळख निर्माण झाली तीच मुळात अझिम प्रेमजी या उद्योगशील व्यक्तीमुळं. देशातील श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचं स्थान तिस-या क्रमाकांवर आहे. मात्र दानशूर व्यक्तींच्या यादीत त्यांनी पहिलं स्थान पटकावलंय. एप्रिल २०१३ ते ऑक्टोबर २०१४ या काळात १० कोटींहून अधिक दान केलेल्या ५० दानशूर व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आलीय.

या यादीत अग्रस्थानी असलेल्या अझिम प्रेमजींनी थोडथोडकं नव्हे, १२ हजार ३०६ कोटींचं दान केलंय. लंडनस्थित वेदांत समूहाचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी या काळात १ हजार ७९६ कोटींचं दान केलंय. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शिव नाडर यांनी १ हजार १३६ कोटी रुपयांचं दान करुन तिसरं स्थान मिळवलंय. रतन टाटा यांनी या काळात ६२० कोटींचं दान केलंय, ते चौथ्या क्रमाकांवर आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे देशातील अतिश्रीमंताच्या यादीत नंबर एकवर असलेले मुकेश अंबानी या यादीत पाचव्या क्रमाकांवर आहेत. त्यांनी ६०३ कोटींचं दान केलय. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे नंदन निलकेणी आणि त्यांच्या पत्नी रोहिणी निलकेणी या दाम्पत्यानं ४९८ कोटींचं दान करून सहाव्या क्रमांक मिळवलाय.

शांघायस्थित हुरुन संशोधन संस्थेनं हा अहवाल प्रकाशित केलाय. या ५० जणांच्या यादीत यावर्षी २७ नवे चेहरे आहेत. दानशूरांच्या यादीतला आणखी एक निष्कर्ष म्हणजे दक्षिण भारतीयांनी यंदा १३ हजार ३०० कोटींचं दान समाजासाठी केलंय, ते उत्तर भारतीयांपेक्षा पाचपटीने जास्त आहे. या ५० दानशूरांपैकी ७३ टक्के मंडळींनी स्वकर्तृत्वावर ही संपत्ती कमावलीय.

देशातील अतिश्रीमंत उद्योजकांच्या सामाजिक बांधिलकीचं हे चांगलं लक्षण आहे. असे आणखी काही अझिम प्रेमजी लाभले तर देशाच्या सर्वंकष प्रगतीचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.