राज्यातील राजकारणात मोठे घमासान सुरु

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत युती तोडण्याची भाषा करण्यात आल्यानं, शिवसेनाही आता 'एकला चालो रे'साठी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्येही जागावाटपावरून घमासान सुरू झालंय.

Updated: Sep 18, 2014, 04:52 PM IST
राज्यातील राजकारणात मोठे घमासान सुरु

मुंबई : भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत युती तोडण्याची भाषा करण्यात आल्यानं, शिवसेनाही आता 'एकला चालो रे'साठी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्येही जागावाटपावरून घमासान सुरू झालंय.

युतीमध्ये शिवसेनेला वाटा मिळतोय आणि भाजपचा मात्र घाटा होतोय. कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप पदाधिका-यांनी आपल्या मनातली ही खदखद जाहीरपणे बोलून दाखवली. शिवसेनेशी युती तोडून स्वबळावर 288 जागा लढवण्याची भाषा भाजप पदाधिका-यांनी केली. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना तूर्तास सबुरीचा सल्ला दिला आहे.

भाजपच्या या आक्रमक पवित्र्याला 'जशास तसे' प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनाही सज्ज झालीय. २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका लढण्याची तयारी ठेवा, असे आदेश पक्षाकडून सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळं युती तुटणार की काय अशी चर्चा रंगू लागलीय.

एकीकडे शिवसेना-भाजप युतीमध्ये दरार निर्माण झाली असताना, आघाडीतही जागावाटपावरून संघर्ष सुरू झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला पुढे करण्यात आलाय. १४४ जागा मिळाल्या नाहीत, तर पूर्ण २८८ जागा लढवणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.

तर अजित पवारांचं हे वैयक्तिक मत आहे. जागावाटपाबाबत आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल, बाहेर नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील संघर्ष वाढीला लागण्याची चिन्हे दिसत आहे. 

महायुती असो नाहीतर आघाडी. आगामी विधानसभा निवडणुकीत आपापला टक्का वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. आता हा प्रेशर टॅक्टीजचा भाग आहे की खरोखरच तुटेपर्यंत ताणण्याची तयारी आहे, हे काही दिवसांत समजेलच.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.