झोपड्डीतील मुलींची 'सीए' गवसणी

बातमी एका जिद्दीची. ठरवलं तर काय घडू शकतं त्या आत्मविश्वासाची.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबईच्या प्रेमा जयकुमारनं सीए परीक्षेत देशात पहिला येण्याचा मान मिळवलाय. कोल्हापूरमध्ये झोपडीत राहणा-या धनश्री तोडकरही सीए परीक्षेत उत्तीर्ण झालीए.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 23, 2013, 06:42 PM IST

www.24taas.com,मुंबई/कोल्हापूर
बातमी एका जिद्दीची. ठरवलं तर काय घडू शकतं त्या आत्मविश्वासाची.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुंबईच्या प्रेमा जयकुमारनं सीए परीक्षेत देशात पहिला येण्याचा मान मिळवलाय. कोल्हापूरमध्ये झोपडीत राहणा-या धनश्री तोडकरही सीए परीक्षेत उत्तीर्ण झालीए.
मुंबईतल्या रस्त्यांवरील रिक्षा चालकाची मुलगी प्रेमा जयकुमार देशात पहिली आलीए. मुंबईतल्या पश्चिम उपनगरात मालाड इथल्या चाळीत प्रेमा आपल्या कुटुंबासह राहते. प्रेमानं ८०० पैकी ६०७ गुण या परीक्षेत मिळवलेत. नोव्हेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेच्या अंतिम टप्प्यात आपल्याला मिळालेल्या यशानं आपण सुखावलो असल्याची प्रतिक्रिया प्रेमानं दिलीए.
विशेष म्हणजे प्रेमासोबतच सीए परीक्षेत तिचा भाऊही या परीक्षेत उत्तीर्ण झालाय. त्यामुळे तिच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. तर कोल्हापूरमध्ये झोपडीत राहणा-या धनश्री तोडकरही सीए परीक्षेत उत्तीर्ण झालीए. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धनश्रीनं यशाला गवसणी घातलीए.
पाच बहिणी, एक भाऊ, अशिक्षित आई-वडील अन् घरातलं दारिद्र्य अशा परिस्थितीत फक्त शिकायचं आणि मोठं व्हायचं या एकाच ध्येयानं प्रेरित होऊन धनश्रीनं प्रचंड मेहनत केली आणि आज हे उत्तुंग यश मिळवलं.