शिवसेनेतील दुफळी विधानसभेत उघड

By Jaywant Patil | Last Updated: Wednesday, April 17, 2013 - 19:30

www.24taas.com, मुंबई
विधीमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. मात्र त्यामध्ये शिवसेना पक्षामध्येच दुफळी माजल्याचं मंगळवारी विधानपरिषदेत ठळकपणे दिसून आलं. सभेमध्ये एखाद्या विषयावर मत मांडण्यासाठी गटनेते दिवाकर रावते संधी देत नसल्याची तक्रार रामदास कदम ह्यांनी चक्क सभागृहातच केली.
विधानपरिषदेमध्ये रामदास कदम यांनी विविध विषयांवर टीका करताना स्वतःच्याच पक्षाचे गटनेते दिवाकर रावते यांनाही टीकेचं लक्ष्य केलं. रावते सभागृहात बोलण्यासाठी वेळ देत नसल्याची त्यांची तक्रार होती. सहकार कायदा सुधारणा विधेयक मंजूर होताना बोलण्यासाठी पुरेसा वेळ दिला नसल्याचा मुद्दा शेकापचे जंयत पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर रामदास कदम यांनीही बोलण्यासाठी संधी मिळाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कदम यांच्या या आरोपांवर रावते यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र कदम यांचे समाधान झाले नाही.
मराठवाड्यातल्या जलसंधारणावर खास चर्चा दिवाकर रावते यांनी उपस्थित केली होती. त्यावर रावते, पांडुरंग फुंडकर बोलतील, असं उपसभापती वसंत डावखरे यांनी स्पष्ट केलं. तेव्हा पुन्हा रामदास कदम कमालीचे संतापले. सभागृहात कोणी बोलायचं, ते जर सभापतींच्या दालनात ठरत असेल तर उद्यापासून आम्ही तोंडावर पट्टी बांधून येतो, असं कदम म्हणाले. यावरही रावते यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रामदास कदम निषेध करत चक्क सभृहातून बाहेर पडले.

रामदास कदम यांनी दिवाकर रावते यांच्या विरोधात आघाडी उघडल्याचं यावरुन स्पष्टपणे दिसून येतंय. तेव्हा आता पक्ष या संदर्भात काय भूमिका घेणार आणि कोणाला कशी समज देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.First Published: Wednesday, April 17, 2013 - 19:30


comments powered by Disqus