राज - अमिताभ : वाद विसरून दोन दिग्गज एकाच व्यासपीठावर!

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, December 23, 2013 - 15:43

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसेच्या आजच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हा सुवर्णयोग जुळवून आणलाय. मराठी अस्मितेच्या मुद्यावरून राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन वितुष्ट आलं होतं. मात्र, आता त्यांच्यात अखेर समेट झालाय आणि आज दोघेही एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
हिंदी सिनेमाच्या कहाणीत अचानक एखादा ट्विस्ट यावा, तशीच काहीशी सुखद आणि अनपेक्षित धक्का देणारी ही बातमी या दोन्ही दिग्गजांच्या चाहत्यांसाठी आहे. अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांची जुळलेली नाळ... अमिताभ म्हणजे हिंदी सिनेसृष्टीचा शहेनशहा... तर राज ठाकरे म्हणजे राजकारणातला सुपरस्टारच... अमिताभच्या एका डायलॉग डिलिव्हरीवर थिएटरमध्ये आणि राजच्या एकेका शब्दावर जाहीर सभेमध्ये हजारो तरूणांच्या टाळ्या आणि शिट्ट्या पडतात. राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं फोटोबायोग्राफीचं पुस्तक काढलं, तेव्हा अर्थातच प्रकाशन समारंभाला जी मोठमोठी नामंवत मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती, त्यातलं एक नाव होतं बिग बी अमिताभ बच्चन.

कारण राज ठाकरे हे अमिताभ बच्चन यांचे कट्टर फॅन आहेत. असं म्हणतात की, राज ठाकरेंनी आपल्या मुलाचं अमित हे नाव अमिताभच्याच नावावरून ठेवलंय. बाळासाहेब ठाकरेंनी बॉलिवूडशी कायम स्नेहपूर्ण संबंध ठेवले, त्यांचाच कित्ता राज ठाकरेंनीही गिरवला. राज आणि अमिताभ हे नातं एवढं घट्ट होतं की, युती सरकारच्या काळात किणी प्रकरणावरून राज वादाच्या भोवऱ्यात सापडले होते, तेव्हा अमिताभ यांच्या घरीच काही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची बैठक झाली होती.

परंतु राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली आणि कहाणीमध्ये ट्विस्ट आला. २००८ मध्ये अमिताभ उत्तर प्रदेशचे ब्रँड एम्बॅसिडर झाले, तेव्हा मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरताना राज ठाकरेंनी टार्गेट केलं ते बिग बी अमिताभ बच्चन यांनाच... मुंबई, महाराष्ट्राने तुम्हाला मोठं केलं आणि तुम्ही युपीचे गोडवे गाता हे चालणार नाही, असं राजनी निक्षून सांगितलं. हा वाद नंतर विकोपाला गेला. एवढा की, मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमिताभच्या जुहूच्या बंगल्यावर सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या. संबंध एवढं बिघडले की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाचं निमंत्रणही राज ठाकरेंना पाठवण्यात आलं नाही.
अभिषेकच्या द्रोण चित्रपटाच्या वेळी अमिताभच्या पत्नी जया बच्चन यांनी राज ठाकरेंवर टीका करण्याची संधी साधली. तेव्हा `गुड्डी बुढ्ढी हो गयी है`, असा प्रतिटोला राज यांनी लगावला. त्यावरून द्रोणच्या रिलीजला मनसेने विरोध केल्यानंतर अमिताभ यांनी दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा टाकला. राज ठाकरे विरूद्ध बच्चन फॅमिली यांच्यात वितुष्ट निर्माण झालं असताना, अमिताभचं मातोश्रीवरील येणं-जाणं मात्र सुरूच होतं... खरं तर वाढलं होतं. उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या कवितांच्या आल्बमचं प्रकाशन अमिताभच्या हस्ते पार पडलं.

अमिताभच्या होम प्रॉडक्शनच्या `बुढ्ढा होगा तेरा बाप` या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळीही मनसेने त्यांना पुन्हा एकदा टार्गेट केले. चित्रपटात परदेशी कलावंतांना वर्क परमिट नसतानाही काम दिले जात असल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलमधील शुटिंग बंद पाडले. हा वाद आणखी वाढू नये, यासाठी म्हणे अमिताभ यांनी स्वतः तेव्हा राज ठाकरेंना फोन केला होता. तेव्हापासून दोघांमध्ये पुन्हा एकदा सौहार्दपूर्ण संबंधांना सुरूवात झाली. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. झालं गेलं गंगेला मिळालं, असं समजून राज आणि छोरा गंगा किनारेवाला अमिताभ पुन्हा एकत्र येत आहेत.
‘कब के बिछडे हुए हम आज यहाँ आके मिले...’ अशी अमिताभची आता अवस्था असणार आहे. तर ‘बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा…’ असं राज ठाकरे गुणगुणत असतील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 23, 2013 - 15:43
comments powered by Disqus