राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडली

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, September 2, 2012 - 15:01

www.24taas.com, मुंबई
रंगशारदा सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत खुमासदार भाषण केलं.
आशाताईंबद्दल बोलताना राज यांनी सवाल केला, मी काय चुकीचं बोललो? पाकिस्तानी कलाकारांना प्रोत्साहन कशासाठी? त्यांना उगीचच का गोंजारायचं? आशाताई म्हणतात, माझा राजकारणाशी काही संबंध नाही... पण, त्या भारतीय तर आहेत ना! एक भारतीय म्हणून त्यांनी हा कार्यक्रम सोडायला हवा. असं राज म्हणाले. ‘दहशतवादी कारवाई थांबेपर्यंत पाकिस्तानी कलाकारांना प्रवेश नाही’ हे राज यांनी पुन्हा स्पष्ट केलं.
आर आर पाटील, दिग्विजय सिंग यांची पुन्हा एकदा राज ठाकरेंनी खिल्ली उडवली. आर आर पाटील हे गृहमंत्री असूनसुद्धा त्यांना काहीच माहित नसतं, असं म्हणत राज यांनी गृहमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला. तर दिग्विजय सिंग यांना काँग्रेसने शिवी खाण्यासाठीच ठेवलं आहे. ठाकरे मूळचे बिहारचे असतील, तर दिग्विजय सिंग यांचं कुटुंब सुलभ शौचालयातलं आहे का? अशा शब्दांत दिग्विजय सिंग यांची संभावना केली.
महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांचे बहुतेक सर्व गुन्हेगार यूपी आणि बिहारचेच असतात. म्हणूनच गुन्हा करून ते बिहारला पळतात आणि तेथे आश्रय घेतात असं राज म्हणाले. कुठल्याही राज्यात जायची कायद्याने परवानगी दिली असली, तरी कसंही राहायची परवानगी दिलेली नाही असं राज यांनी स्पष्ट केलं. याचबरोबर मी कायद्याला घाबरत असं ही राज म्हणाले.
हिंदी वृत्तवाहिन्यांचा समाचार घेताना राज म्हणाले की माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्याचा खेळ हिंदी वृत्तवाहिन्यांनी थांबवावा, अन्यथा मी त्यांचाच खेळ थांबवेन. जर माझं बोलणं हिंदी चॅनल्सना समजत नसेल, तर त्यांनी मराठी पत्रकारांना विचारावं, योग्य माहिती घ्यावी आणि मगच बातमी द्यावी. टीआरपीसाठी माझ्याबद्दल वाट्टेल ते पसरवू नये, असं म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा हिंदी वृत्तवाहिन्यांना टार्गेट केलं.First Published: Sunday, September 2, 2012 - 13:54


comments powered by Disqus