`रात्रपुत्र` राजकारणात सक्रिय?

मनसेच्या पाठशाळेत सध्या एक `राजपुत्र` राजकारणाची बाराखडी गिरवतोय. राज ठाकरेंप्रमाणेच या युवराजांचीही सध्या पक्षात हळूहळू क्रेझ वाढतेय. कोण आहेत हे युवराज आणि कसा सुरु आहे त्यांचा कोचिंग क्लास...!

Updated: Jan 11, 2014, 11:53 AM IST

www.24taas.com, दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई
मनसेच्या पाठशाळेत सध्या एक `राजपुत्र` राजकारणाची बाराखडी गिरवतोय. राज ठाकरेंप्रमाणेच या युवराजांचीही सध्या पक्षात हळूहळू क्रेझ वाढतेय. कोण आहेत हे युवराज आणि कसा सुरु आहे त्यांचा कोचिंग क्लास...!

ब्ल्यू रंगाची जीन्स, चौकडीचा शर्ट, कोण हा यंग बॉय? त्याच्या चोहोबाजूला होतेय कार्यकर्त्यांची गर्दी, कुणी त्याच्याबरोबर फोटो काढून घेतोय, तर कुणी त्याचा ऑटोग्राफ घेतंय. पोलिसांनाही त्याच्याशी शेकहँण्ड करण्याचा मोह आवरता येत नाहीय. नाशिकमध्ये गुरूवारी पार पडलेल्या मनसेच्या बैठकीतली ही ताजी दृश्य.
हा तरूण आहे तरी कोण ??? मनसेच्या बैठकीत त्याचं काय काम ??? राज ठाकरेंसारखीच पक्षात त्याची क्रेझ कशी काय ??? हे प्रश्न तुम्हाला पडले असतील. या प्रश्नाचं उत्तर सोप्पंय... हा आहे, अमित राज ठाकरे... राज ठाकरेंचा पुत्र.. एरव्ही वडिलांच्या राजकीय सभांमध्ये, निवडणुकीत पक्षाच्या प्रचारामध्ये आणि कौटुंबिक सोहळ्यांमध्ये दिसणारा अमित आता चक्क पक्षाच्या बैठकांमध्येही वावरू लागलाय.
राज ठाकरेंच्या सूचनेनुसारच त्याला बैठकांमध्ये सहभागी करुन घेतलं जातंय. नाशिकमध्ये गुरुवारी लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी पक्षाच्या पदाधिका-यांची बैठक झाली. बैठकीत अमित सहभागी झाला.
स्थानिक पदाधिकारी नेत्यांकडे काय मतं मांडतात, याचं त्यानं बारकाईनं निरीक्षण केलं. भविष्यात अमित राजकारणात आला तर त्याचं फिल्डवरच्या राजकारणाप्रमाणेच प्रशासकीय ज्ञानही पक्कं असावं हा या पाठशाळेचा हेतू असावा.

अमित ठाकरे
अमित गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात हळूहळू सक्रिय होतोय.

निवडणुकीच्या प्रचारात आणि सभेला त्याची आवर्जून उपस्थिती असते.

नाशिकच्या बैठकीत तो काहीही न बोलता, फक्त निरीक्षण करीत होता.
फुटबॉल खेळात प्रचंड रुची दाखविणारा अमित माटुंग्याच्या रुपारेल कॉलेजमध्ये बी. कॉमच्या शेवटच्या वर्षात शिकतोय. अमितच्या राजकीय प्रवेशाबाबत मनसेचे नेते, पदाधिकारी किंवा त्याचे मित्र अधिकृतपणे काहीही बोलण्यास तयार नाहीत. राज ठाकरेंकडून आपली खरडपट्टी निघू शकते याची जाणीव त्यांना आहे.
मात्र अनौपचारिक गप्पांमध्ये अमित लवकरच राजकारणात दिसेल अशी खात्री ते देतात. अमितचा चुलत भाऊ आदित्य ठाकरे यापूर्वीच राजकारणात आलाय. शिवसेनेत आदित्यची स्वतःची युवा सेना आहे.
युवा वर्गात उद्धव आणि राज यांचे स्वतंत्र फॉलोअर्स असताना, आदित्यही आपलं स्थान पक्कं करु लागलाय. आता अमित नावाचा आणखी एक ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी एन्ट्री करणार, याची उत्सूकता मनसैनिकांना आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.