उद्धव ठाकरेंच्या सभेचे राज यांना आव्हान?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जालन्यात सभा होत आहे. मात्र, राज यांच्यासमोर शिवसेनेचे पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभेचा रेकॉर्ड तोडण्यासाठी गर्दी जमविण्याचे आव्हान असणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 5, 2013, 01:14 PM IST

www.24taas.com,मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जालन्यात सभा होत आहे. मात्र, राज यांच्यासमोर शिवसेनेचे पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभेचा रेकॉर्ड तोडण्यासाठी गर्दी जमविण्याचे आव्हान असणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी सेनेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मराठवाड्यातील जालन्यात मोठी सभा घेतली. या पहिल्याच सभेला मिळालेला प्रतिसाद बघता राज ठाकरे यांच्या सभेला किती प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष आहे. उद्धव यांनी आपल्या अजेंठ्यावर दुष्काळी प्रश्न ठेवला आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळाचा प्रश्न राजकीय पक्षांचा चर्चेचा विषय आहे.
राज्याच्या नियोजित दौ-यावर निघालेल्या राज ठाकरे यांच्यासमोर दुष्काळाचा प्रश्न आहेच. त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या सभेपेक्षा जास्त गर्दी जमविण्याचे आव्हान आहे. त्यामुळे जालन्यातील आजच्या सभेसाठी शिवसेनेपेक्षाही जास्त गर्दी जमविण्याचे आदेश मनसैनिकांना देण्यात आलेचे बोलले जात आहे.
राज्याच्या दौ-याला सुरुवात करताना उद्धव यांनी पहिल्या सभेसाठी दुष्काळग्रस्त मराठवाड्याची निवड केली. जालन्यात त्यांच्या सभेला जवळपास दोन लाखांची गर्दी झाली. त्यामुळे मराठवाड्यात शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच उद्धव यांनाही प्रतिसाद मिळत असल्याचे तर्क लढविले जात आहेत.

राज ठाकरे यांचाही महाराष्ट्राचा दौरा सुरू होत आहे. राज यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी जालन्यात जी मोठी सभा घेतली त्यापेक्षा मोठी सभा घेण्याचे आव्हान आता मनसेसमोर उभे आहे. त्यासाठी मुंबई, नाशिकमधील नेते कामाला लागले आहेत.

राज यांची दोन मार्च रोजी जालना येथे सभा होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सभेपेक्षा मोठी गर्दी झाली पाहिजे असे आदेश मनसे पदाधिका-यांना देण्यात आल्याचे वृत्त आहे. एक महिना हाताशी असल्याने सर्व प्रयत्न करून राज यांची सभा भव्य दिव्य होईल याची काळजी घेण्याचे मराठवाडा आणि विदर्भातील नेत्यांना वरिष्ठ पातळीवरून आदेश दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलेय.