राज्यसभेच्या सात जागांसाठी ७ फेब्रुवारीला

राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या 7 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन, तर शिवसेना-भाजपचा प्रत्येकी 1 उमेदवार सहज निवडून येणार आहे. परंतु सातव्या जागेसाठी चुरशीची निवडणूक रंगणार असून, एखाद्या उद्योगपतीच्या गळ्यात ही जागा पडेल, अशी चिन्हं सध्या तरी दिसतायत...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 22, 2014, 10:27 PM IST

www.24taas.com, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई
राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या 7 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन, तर शिवसेना-भाजपचा प्रत्येकी 1 उमेदवार सहज निवडून येणार आहे. परंतु सातव्या जागेसाठी चुरशीची निवडणूक रंगणार असून, एखाद्या उद्योगपतीच्या गळ्यात ही जागा पडेल, अशी चिन्हं सध्या तरी दिसतायत...
लोकसभा निवडणुकांच्या आधीच राज्यसभा निवडणुकांचा बिगूल वाजलाय.. महाराष्ट्राच्या विधानसभा आमदारांच्या वतीनं राज्यसभेवर निवडून द्यायच्या 7 जागांसाठी येत्या 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ एड. माजिद मेमन अशा दोघांची उमेदवारी घोषित करून आघाडी घेतलीय. पवार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्यानं त्यांनी राज्यसभेची वाट धरलीय. तर काँग्रेसच्या वतीनं मावळते खासदार हुसेन दलवाई यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या वतीनं मुरली देवरा यांच्या जागी दुसरा उमेदवार म्हणून माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपच्या वतीनं मावळते खासदार व पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनाच पुन्हा राज्यसभा उमेदवारी दिली जाणार आहे. शिवसेनेच्या वतीनं मावळते खासदार राजकुमार धूत यांचं नाव पक्कं मानलं जातंय. तर दुसरे निवृत्त खासदार भारतकुमार राऊत यांचा पत्ता कटला आहे.त्यामुळं आता सातव्या जागेचं गणित रंगतदार बनलंय...
महाराष्ट्र विधानसभेत सध्या एक जागा रिक्त असल्यानं एकूण 287 आमदार आहेत. त्यामुळं राज्यसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 36 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेसकडे दोन उमेदवारांचा कोटा पूर्ण करत, 10 मते शिल्लक राहतात. राष्ट्रवादीचे 62 आमदार आहेत आणि त्यांना 9 अपक्ष आमदारांचे समर्थन आहे. त्या जोरावर राष्ट्रवादीचेही दोन्ही उमेदवार सहजपणे विजयी होतील. भाजपच्या संख्याबळानुसार एका उमेदवाराचा कोटा पूर्ण करून 9 अतिरिक्त मते शिल्लक राहतात. तर शिवसेनेकडे एका उमेदवाराचा कोटा भरल्यानंतर 8 मते शिल्लक राहतात. मात्र एवढ्या 17 मतांवर शिवसेनेचा दुसरा उमेदवार विजयी होण्याची शक्यता कमी आहे. राज्यसभेसाठी खुलं मतदान असल्यानं राजकीय पक्षाच्या आमदारांच्या मतांची फोडाफोडही करता येत नाही.
अशा परिस्थितीत सर्व पक्षांकडील अतिरिक्त मतांची आणि मनसे तसेच अन्य छोट्या पक्षांच्या मतांची मोट बांधू शकेल, असा सातवा उमेदवार राज्यसभेची सातवी जागा जिंकू शकतो. हा सातवा उमेदवार मतांची बेगमी कशी करू शकतो, यावरच सगळी मदार अवलंबून असणार आहे. त्यामुळं सर्वांना मान्य होईल अशा एखादा उद्योगपतीचीच या जागी वर्णी लागेल, अशी शक्यता वर्तवली जातेय. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु ऐनवेळी शरद पवार यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला होता. त्यामुळं आता सातव्या जागेसाठी कोण रिंगणात उतरणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 28 जानेवारी ही अंतिम मुदत आहे. कदाचित शिवसेना-भाजपकडे सातव्या जागेसाठी सक्षम उमेदवार नसल्यानं कदाचित ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही आहे...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.