चार वर्षांच्या चिमुरडीवर स्कूलबसमध्ये बलात्कार!

By Shubhangi Palve | Last Updated: Sunday, September 15, 2013 - 11:33

www.24taas.com, झी मीडिया, बदलापूर
दिल्ली गँगरेप आरोपींना कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर दोन दिवसही उलटले नाहीत तर मुंबईत अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर स्कूलबसच्या क्लिनरनं बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय.
राजधानी दिल्लीसोबतच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही महिला सुरक्षित नाहीत हे आधीच अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झालंय. मात्र, अगदी चार वर्षांच्या चिमुरड्याही सेफ नाहीत हेही आता सिद्ध झालंय. बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडलीय. सिनीयर केजीमध्ये शिकणाऱ्या चिमुरडीवर बसच्या क्लिनरनच बलात्कार केल्याचं स्पष्ट झालंय. क्लिनरचं नाव संदीप केरवे असून पोलिसांनी त्याला अटक केलीय.
६ सप्टेंबर रोजी ही मुलगी स्कूल बसमध्ये बसली असताना, जादू दाखवतो असं म्हणून बसच्या क्लिनरनं या चिमुरडीला मागच्या सीटवर नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर मुलीनं ही घटना शाळेतील शिक्षकांना सांगितली. शिक्षकांनी क्लिनरला खडसावून असे प्रकार पुन्हा होता कामा नये, असं बजावून सांगितलं आणि या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यानंतर ४-५ दिवसानंतर मुलीला त्रास होऊ लागल्यानं मुलीनं आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर घरच्यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून क्लीनर संदीप केरवे याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी स्कूल बस ज्या कंपनीची होती, त्या लक्ष्मी ट्रॅव्हलच्या बसची तोडफोड केलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, September 15, 2013 - 10:09
comments powered by Disqus