'सामना'मध्ये मुख्यमंत्र्यांवर टीका

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्या आले आहे. राज्यात नवीन काय चालले आहे? पटकथा तीच; नायक नवा! .. जे दाभोळकर प्रकरणात झालं तेच पानसरे प्रकरणी घडत असल्याची सामनातून टीका करण्यात आली आहे.

Updated: Feb 23, 2015, 11:00 AM IST
'सामना'मध्ये मुख्यमंत्र्यांवर टीका  title=

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्या आले आहे. राज्यात नवीन काय चालले आहे? पटकथा तीच; नायक नवा! .. जे दाभोळकर प्रकरणात झालं तेच पानसरे प्रकरणी घडत असल्याची सामनातून टीका करण्यात आली आहे.

पाहू या सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा  

राज्यात नवीन काय चालले आहे? पटकथा तीच; नायक नवा!
जे दाभोलकर प्रकरणात झाले तेच पानसरेप्रकरणी घडत आहे. कथा, पटकथा व संवाद बदलले नाहीत. नायक, खलनायक बदलून जुन्याच पटकथेवर नवा सिनेमा सुरू आहे. पानसरे हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी २० टीम स्थापन केल्या आहेत. दाभोलकरांच्या वेळीही अशा ‘टीम’ स्थापन झाल्याच होत्या. महाराष्ट्रात नवीन काय चालले आहे? कोणी सांगेल काय?
अठरा महिन्यांनंतरही दाभोलकरांचे मारेकरी सापडलेले नाहीत व कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे खुनी अद्यापही मोकाटच आहेत. दाभोलकरांचा खून झाला तेव्हा तत्कालीन गृहमंत्र्यांचा राजीनामा जोरात मागितला गेला होता. आता विरोधक नेमके तेच करीत आहेत. पानसरे यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असे आश्‍वासन गृहखाते सांभाळणार्‍या मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा कॉंग्रेसचे मुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी नेमके हेच आश्‍वासन दिले होते की, ‘‘दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू.’’ पण दाभोलकरांचे मारेकरी अजूनही गायब आहेत व पानसरे यांच्या मारेकर्‍यांसंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी तेच विधान केले. पानसरे यांच्या मारेकर्‍यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आणखी एक जोरकस विधान केले आहे ते म्हणजे ‘‘पोलिसांनी ताकद लावली तर आरोपी पकडण्यात निश्‍चित यश मिळेल!’’ मुख्यमंत्र्यांचे हे विधान गमतीचे आहे व पोलिसांवर खापर फोडणारे आहे. ज्या पोलिसांवर ते अविश्‍वास दाखवीत आहेत ते गृहखाते स्वत: मुख्यमंत्री सांभाळीत आहेत. पोलिसांनी जोर लावावा म्हणजे नेमके काय करावे? याबाबत नामदार मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले नाही. पानसरे यांचे खुनी शोधण्यात पोलीस चालढकल करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते 
अपयश गृहखात्याचे 
आहे. खुनी सापडत नाहीत हे ‘सिस्टीम’चे म्हणजे व्यवस्थेचे अपयश असल्याचे मागे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. जनतेने सरकार बदलले आहे, तुम्ही ‘सिस्टीम’ बदला. ती बदलता येत नसेल तर अपयशाचे खापर दुसर्‍यांवर फोडण्याआधी त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करा. आत्मचिंतन करा असे आम्ही सुचवणार नाही. कारण कायदा व सुव्यवस्था हा विषय चिंतनाचा नसून कृतीचा आहे. दाभोलकरांचे खुनी शोधण्यासाठी पोलिसांनी तेव्हाही जंग जंग पछाडलेच होते व आता पानसरे यांचे खुनी शोधण्यासाठीदेखील पोलीस शर्थ करीत आहेत. मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी बदलले, पण प्रशासकीय व्यवस्था तीच आहे. राज्यकर्ते येत जात असतात, ‘सिस्टीम’ तीच असते. मुख्यमंत्र्यांना ती मान्य नसेल तर त्यांनी सिस्टीमचा चेहरा बदलायला हवा. सरकार बदलले, पण महाराष्ट्रात काय बदलले? हा प्रश्‍न कायम आहे व उद्या हा प्रश्‍न आपल्याला जनता विचारणार आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. दाभोलकरांप्रमाणे पानसरे यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाली आहे. राजू शेट्टी व त्यांची शेतकरी संघटना सरकारवर आगपाखड करीत हिंसक आंदोलने करीत आहे. हे सर्व यासाठी सांगायचे की, सत्ता आपल्या हाती आहे. तेव्हा 
‘सिस्टीम’वर खापर 
फोडून चालणार नाही. सिस्टीम ही धावणार्‍या व उधळणार्‍या घोड्यासारखी असते. त्यावर घट्ट मांड ठोकून बसेल तोच राज्य चालवेल. महाराष्ट्रात अतिरेकी शक्तींची भीड चेपली आहे आणि ते खून व हत्या करीत आहेत. पोलिसांनी जोरात प्रयत्न करूनही मारेकरी सापडत नाहीत, पण सरकार पोलिसांसाठी काय करते आहे? पोलिसांची ‘सिस्टीम’ अत्याधुनिक व्हायला हवी व सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागायला हवेत. ते का होत नाही? पोलिसांना दोष देणे सोपे आहे. पोलिसांना हवे ते द्या व मग त्यांच्यावर अपयशाचे खापर फोडा. महाराष्ट्रात पुरोगामी चळवळी दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण ते करणारे लोक पाकिस्तानातून आलेले नाहीत. दाभोलकर आणि पानसरे इकडचेच व त्यांचे खून करणारेदेखील याच मातीतले आहेत. पानसरे खून प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. कारण गृहखाते ते सांभाळीत आहेत व प्रत्येक खुनानंतर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा पायंडा पडला आहे. जे दाभोलकर प्रकरणात झाले तेच पानसरेप्रकरणी घडत आहे. कथा, पटकथा व संवाद बदलले नाहीत. नायक, खलनायक बदलून जुन्याच पटकथेवर नवा सिनेमा सुरू आहे. पानसरे हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी २० टीम स्थापन केल्या आहेत. दाभोलकरांच्या वेळीही अशा ‘टीम’ स्थापन झाल्याच होत्या. महाराष्ट्रात नवीन काय चालले आहे? कोणी सांगेल काय?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.