‘अजित पवार - राष्ट्रवादीचा टोणगा’

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, May 30, 2013 - 13:56

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादीच्या एका सभेत माजी शिवसैनिक आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेत भास्कर जाधव यांनी अजित पवार यांच्यासमोर ठाकरे आणि शिवसेना यांची जोरदार खिल्ली उडवली. या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका करत त्यांना ‘राष्ट्रवादीचा टोणगा’ असं संबोधलंय.
गुहागरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेशाच्या वेळी भास्कर जाधव यांनी आदित्य ठाकरे यांना वासरू म्हणून संबोधलं होतं तर उद्वव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टिका करत व्यंग साधलं होतं. त्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘खरं तर भास्कर जाधव यांनी केलेली टीका ही काही दखल घेण्यासारखी गोष्ट नाही... त्यांना त्यांच्या पक्षात सध्या काय स्थान आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे’असं म्हणत त्यांनी जाधवांना उडवून लावलंय.

सोबतच राऊत यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला. ‘भास्कर जाधव यांच्या बाजुला राष्ट्रवादीचा जो टोणगा (अजित पवार) आहे... आणि या टोणग्याने महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवली होती ती अत्यंत निर्लज्जपणाचा कळस असताना तुम्ही आमच्या नेतृत्वाबद्दल, युवा नेतृत्वाबद्दल जी भाषा वापरली तो केवळ मूर्खपणा म्हटला पाहिजे... मराठवाड्यातील आणि सोलापुरातील दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवताना जी भाषा वापरली त्याचा निषेध अजूनही महाराष्ट्रातून होतोय... हे भास्कर जाधवांना दिसलं नाही... आणि अशी टीका करून त्यांच्या पक्षातील टोणग्यांची पापं काही लपली जाणार नाहीत’असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 30, 2013 - 13:56
comments powered by Disqus