कोर्टाच्या निर्णयाआधीच सेनेची शिवाजी पार्कात जाहिरातबाजी!

शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय, शिवाजी पार्कवर दसरामेळावा व्हावा यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरु केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 5, 2013, 05:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय, शिवाजी पार्कवर दसरामेळावा व्हावा यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरु केलीय. उच्च न्यायालयाच्या निकालाआधीच शिवसेनेनं शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जाहिरातबाजी केलीय. गमावलेला दादरचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसैनिकांची ही धडपड मानली जातेय.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजी पार्क सायलेन्ट झोन म्हणून घोषित झाल्यानं गेली दोन वर्षे शिवसेनेला दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी संघर्ष करावा लागतोय. यंदाही महापालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेनं शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलीय. ‘एमएमआरडीए’ मैदानावर दसरा मेळावा आयोजनासाठी सत्तर लाख रुपये भाडं भरणं अशक्य असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. न्यायालयानं एमएमआरडीए, महापालिका आणि वेकॉम या संस्थाना आपलं म्हणण मांडण्याचे आदेश दिलेत. याप्रकरणी पुढील सुनावणी आठ ऑक्टोबरला होणार आहे.
मनसेकडे गेलेल्या दादरच्या बालेकिल्ल्यावर पुन्हा भगवा फडकवण्याचं आव्हान शिवसैनिकांपुढे आहे. शिवसेना नेते डॉक्टर मनोहर जोशी यांचं या बालेकिल्ल्यावरचं वर्चस्व कमी झाल्यानं ही जबाबदारी काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत आलेल्या सदा सरवणकर यांनी आपल्या खांद्यावर घेतलीय. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली होणारा हा पहिला दसरा मेळावा असल्यानं जाहिरातीच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जातेय.

गेली दोन वर्षं शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी न्यायालयानं सर्शत परवानगी दिली होती. मात्र, दोन्ही वेळा न्यायालयानं नेमून दिलेल्या आवाजाचं मर्यादेचं शिवसेनेनं उल्लंघन केलंय. याप्रकरणी मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हाही दाखल झालाय. या घटनांची दखल घेत न्यायालय काय निर्णय घेत याबाबत उत्सुकता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.