विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचा दावा, एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते

विधीमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेनं दावा केला असून एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी असं पत्र शिवसेनेनं विधानसभा सचिवांना दिलं आहे. 

Updated: Nov 10, 2014, 06:48 PM IST
विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचा दावा, एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते title=

मुंबई: विधीमंडळातील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेनं दावा केला असून एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी असं पत्र शिवसेनेनं विधानसभा सचिवांना दिलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसविषयी भाजपानं त्यांची भूमिका जाहीर करावी, अन्यथा आम्ही विरोधी बाकावर बसू अशी अट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासमोर ठेवली होती. मात्र आजपासून सुरु झालेल्या विधी मंडळाच्या विशेष अधिवेशनात शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष उघडपणे दिसून आला. शिवसेनेनं विरोधी बाकांवर बसून भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले. तसंच मराठी शाळांमध्ये उर्दूचं शिक्षण देण्यावरुनही शिवसेना आमदारांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना 'हिरवी टोपी' भेट देऊन निषेध दर्शवला होता. 

संध्याकाळी शिवसेनेच्यावतीनं विधानसभा सचिवांना पत्र दिलं. ६३ जागांवर विजय मिळवून शिवसेना विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. याआधारे शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदावर निवड करावी अशी मागणी आम्ही विधानसभा सचिवांना केल्याचं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. 

बुधवारी भाजपा सरकारला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाची परीक्षा द्यायची आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी भाजपाला शिवसेनेचा पाठिंबा आवश्यक होता. आता शिवसेनेनं विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्यानं भाजपाला राष्ट्रवादीची गरज भासणार असं दिसतंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.