शिवसेना आमदार घोसाळकर यांच्याविरोधात गुन्हा

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, January 18, 2014 - 07:14

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचे दहिसर येथील आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात शुक्रवारी रात्री दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांची रुग्णालयात जाऊन जबानी घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
सार्वजनिक स्वच्छतागृहात मोबाईल क्रमांक लिहून बदनामी करीत असल्याची तक्रार शीतल म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी दहिसर पोलीस ठाण्यात केली होती. मात्र, त्या वेळी गुन्हा दाखल न करता मोबाईल क्रमांक पुसून टाकण्यात आले होते. मात्र, हे प्रकरण चिघळल्याने म्हात्रे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
म्हात्रे-घोसाळकर प्रकरणावरून शिवसेनेतील वाद तापलेला असतानाच राष्ट्रीय महिला आयोगाने पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवाल मागविला. पोलिसांनी शुक्रवारी बोरिवली आयसी कॉलनीतील एम.एम. रुग्णालयात जाऊन म्हात्रे यांची जबानी घेतली. पोलिसांनी म्हात्रे यांची रुग्णालयात जाऊन जबानी घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तक्रार केली होती, तेव्हा गुन्हा दाखल का नाही केला, असा प्रश्‍न विचारून म्हात्रे यांनी पोलिसांना फटकारल्याचे समजते.
विनोद घोसाळकर यांच्यावर ५०१, ५०६ आणि ५०९ या कलमांअंतर्गत अश्‍लील शब्द वापरणे, तसेच गैरवर्तन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी घोसाळकर यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे दहिसर पोलिस ठाण्यामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे घोसाळकर यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याचीही उत्सुकता लागली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 18, 2014 - 07:04
comments powered by Disqus