शिवसेनेची झाली गोपनिय बैठक

मुंबईत आज शिवसेना नेते उपनेते आणि महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची अत्यंत गोपनीय बैठक झाली. 

Updated: May 12, 2017, 06:12 PM IST
शिवसेनेची झाली गोपनिय बैठक  title=

मुंबई : मुंबईत आज शिवसेना नेते उपनेते आणि महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची अत्यंत गोपनीय बैठक झाली. 

या बैठकीचा तपशील अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे.  परंतु झी २४ तासला मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच  संघटनात्मक वाढीसाठी शिव संपर्क अभियान महाराष्ट्रात सुरू आहे. त्यातला पुढचा टप्पा काय असावा... दिशा काय असावी... या संदर्भात पक्ष प्रमुखांनी मार्गदर्शन केलंय. अणि प्रत्येकाला कामाला लागा असे आदेश दिलेत. 

आमचा संवाद महाराष्ट्राच्या जनतेशी ३६५ दिवस असतो. म्हणूनच आज संपर्क प्रमुखांना बोलावून चर्चा केली आहे, असेही राऊत यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजपच्या संवाद यात्रेवर टोला लगावला. 
 

'सामना' जाळणाऱ्यांवर राऊतांची जोरदार टीका

शिवसेना मुखपत्र 'सामना' अंक जाळणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर कार्यकारी संपादक आणि पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. 

शिवसेनेच्या गोपनीय बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. 'सामना' धगधगत्या विचारांचा ज्वालामुखी असून अंक जाळणाऱ्यांनी हात पोळणार नाहीत ना याची काळजी घ्यावी असं राऊत यांनी म्हटलंय. 

तसेच कालच्या अंकात भाजपचे मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यशैलीचे कौतूक केलं असल्याने भाजप कार्यकर्ते नेमके कोणता अंक जाळत आहेत? असा उपहासात्मक सवाल राऊत यांनी उपस्थित केलाय. 

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱयांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे सध्या शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांविरोधात हिंसक आंदोलन सुरू आहे.