शेतकरी हवालदिल, शिवसेना-भाजपमध्ये कुरघोडीच्या राजकारण मश्गूल

एकीकडे पावसानं दडी मारल्यानं महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झालाय. तर दुसरीकडं शिवसेना आणि भाजप हे सत्ताधारी पक्ष मात्र या ना त्या निमित्तानं कुरघोडीच्या राजकारणात मश्गूल आहेत.

Updated: Jul 8, 2015, 10:59 PM IST
शेतकरी हवालदिल, शिवसेना-भाजपमध्ये कुरघोडीच्या राजकारण मश्गूल title=

सागर कुलकर्णी, दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई: एकीकडे पावसानं दडी मारल्यानं महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झालाय. तर दुसरीकडं शिवसेना आणि भाजप हे सत्ताधारी पक्ष मात्र या ना त्या निमित्तानं कुरघोडीच्या राजकारणात मश्गूल आहेत.

गेल्या पंधरवड्यापासून पर्जन्यराजा रूसून बसलाय... पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट बळीराजावर कोसळलंय. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनलाय.. ये रे ये रे पावसा, अशी आळवणी पुन्हा एकदा सुरू झालीय.. पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट गडद होतंय... मात्र सत्ताधारी पक्षाला त्याचं ना सोयर ना सूतक... त्यांचा आपला एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ मागील पानावरून पुढं सुरूच आहे.

पाहा कोणकोणत्या मुद्द्यावरून सुरू आहे श्रेयाचं राजकारणात

- एलईडीच्या दिव्यावरून आदित्य ठाकरे विरूद्ध आशिष शेलार असं ट्विटर वॉर पुन्हा रंगलंय.
- कोस्टल रोड अजून कागदावरच आहे. पण आतापासूनच कोस्टल रोडला कुणाचं नाव द्यायचं, यावरून श्रेयाची लढाई जुंपलीय.
- भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव काय झाला. सामनातून उपदेशाचे डोस पाजायला सुरूवात झालीय.
- आणि आता सार्वजनिक उत्सवांवर कोर्टानं घातलेले निर्बंध हटवण्याच्या निमित्तानं युतीत पुन्हा शिमगा सुरू झालाय.

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांच्या पुढाकारानं भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिष्टमंडळानं मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी दरवर्षीप्रमाणेच सण साजरे होतील. गरज भासल्यास कायद्यात सुधारणा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

आता त्याच मुद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही मुख्यमंत्र्यांची वेगळी भेट घेतली. सत्तेत एकत्र असूनही युतीचे नेते एकमेकांशीच किती काळ झुंजत बसणार..? पावसाअभावी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यासाठी एखादं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडं नेण्याची सुबुद्धी यांना कधी सुचणार? असे सवाल आता उपस्थित होतायत.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.