बकऱ्यांच्या पोटात दडलयं तरी काय?

Last Updated: Thursday, April 25, 2013 - 14:40

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ड्रग्स, अॅन्थ्रॅक्स या सारख्या घातक पदार्थांची भारतात तस्करी केली जात आहे. आणि ती सुद्धा एका बकऱ्यांच्या पोटामध्ये लपवून याच बकर्‍या रहस्यमय ठरल्या आहेत. त्यांच्या पोटात जैविक हल्ल्याचे घातक विषाणू आहेत की आणखी काही याचा शोध घेण्यासाठी कस्टम, पोलीस आणि देशाच्या हेरखात्याने रुग्णालयाच्या डॉक्टरांना कामाला लावले आहे. तब्बल १४ तास खपून या बकर्‍यांचा एक्स-रे काढण्यात आला आहे. पण रहस्य काही उलगडले नाही... पोलीस मात्र जागत्या पहार्‍यावर आहेत!
या संशयास्पद बकर्‍यांमुळे सर्वांचीच पाचावरण धारण बसली. बकर्‍यांची कसून तपासणी झाली. तीसुद्धा इनकॅमेरा. त्यानंतर या बकर्‍या यलोगेट पोलिसांच्या ताब्यात दिल्या गेल्या. या बकर्‍यांपैकी ६ बकर्‍यांचा दरम्यानच्या काळात मृत्यू झाला. २४ बकर्‍या आज पुन्हा बैलघोडा रुग्णालयात आणल्या गेल्या. त्यांचे एक्स-रे पुन्हा काढले गेले. अमली पदार्थ किंवा हिरे त्यांना खायला दिले असते तर इतके दिवस पोटात राहिले नसते. तरीही त्यांच्या शरीरात काहीतरी लपवले किंवा लपले आहे असा डॉक्टरांचा दाट संशय आहे.
एक बकरी ३ लाख रुपये किमतीची आहे. चार पोलिसांचा ताफा रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. दर तासाला बकर्‍यांची मोजदाद करत आहे. एकूणच बैलघोडा रुग्णालयातील हे बकरीनाट्य प्रचंड रहस्यमय बनले आहे. या रहस्यमय प्रकरणाला महिनाभरापूर्वी सुरुवात झाली. इराकहून आलेले एक जहाज मुंबई बंदराला लागले. या जहाजातील भंगाराच्या कंटेनरमध्ये ३० बकर्‍या होत्या. त्यांच्यासोबत गोणी भरून मोबाईल फोन आणि अन्य सामानही होते. एकूणच प्रकार संशयास्पद असल्याने कंटेनरमधील सामान कस्टमने ताब्यात घेतले आणि ३० बकर्‍याही!First Published: Thursday, April 25, 2013 - 14:32


comments powered by Disqus