धावत्या रेल्वेत महिलांच्या मदतीसाठी... `एसओएस`

दिवसा किंवा रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वेच्या डब्यांमध्ये ‘एसओएस’प्रणाली सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा विचार सुरू आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 3, 2013, 05:10 PM IST

www.24taas.com, मुंबई
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्य रेल्वेने आणखीन एक पाऊल पुढे टाकलंय. आता दिवसा किंवा रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वेच्या डब्यांमध्ये ‘एसओएस’प्रणाली सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा विचार सुरू आहे. ही सेवा लागू झाली तर अशी सेवा सुरू करणारी मध्य रेल्वे ही जगातील पहिली रेल्वे ठरू शकेल.
‘एसओएस’ प्रणालीमध्ये एक बटण महिलांच्या डब्यात बसविले जाईल. या बटणाचं थेट कनेक्शन मध्य रेल्वेच्या कंट्रोल रुममध्ये असेल. त्यामुळे नेमकी कोणत्या लोकलमध्ये, कोणत्या डब्यामध्ये मदत तात्काळ पोहचविणे शक्य होणार आहे. यासोबतच रेल्वेच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा विचारही सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी दिलीय.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे रेल्वेत होणाऱ्या चोऱ्यांनादेखील आळा घालता येणं शक्य होऊ शकेल. प्रायोगिक तत्त्वावर १५ जानेवारीपासून लोकलच्या एका डब्यात सीसीटीव्ही बसविलेली पहिली लोकल धावणार आहे. डेन्मार्कमधील फोकॉन कंपनीच्या मदतीने ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.