शहरांमध्ये वाढतंय नैराश्य...

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, April 3, 2013 - 10:49

www.24taas.com, मुंबई

कामाचा ताण, सुपरफास्ट लाईफ, प्रदूषण, वाढती महागाई आणि त्यात जगण्याची धडपड... या सगळ्याचा ताण-तणावाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर आता स्पष्टपणे दिसून येतोय. तसंच यामुळे नैराश्यातही वाढ झालेली आढळून आलीय.
मुंबईकरांच्या श्वासोच्छवासावर याचा सर्वात जास्त परिणाम झालेला दिसून आलंय. तणावामुळे प्रकृतीवर विपरीत परिणाम होत असून धाप लागणे, झोप उडणे, छातीत दुखणे, श्वारस घेण्यास त्रास होणे, वजन वाढणे, लठ्ठपणा, उदासीनता अशा अनेकविध व्याधी मुंबईकरांमध्ये दिसत आहेत. जगातील आकडेवारीनुसार – ११० दशलक्ष व्यक्ती दर वर्षी ‘स्ट्रेस`मुळे जीव गमावतात. त्यानुसार दर दोन सेकंदांनी जगातील सात व्यक्तींचा तणावाने बळी जातो. भारतातही त्याचे प्रमाण वाढत असून, ५७ टक्के लोकांना स्ट्रेसमुळे जीव गमवावा लागतो आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कोणत्याही ध्येयासाठी नव्हे, तर पोटाची खळगी भरण्यासाठी जे काम करावे लागते, त्या कामाच्या ‘डेडलाईन`च्या ताणात जाणाऱ्यांची संख्या आपल्या देशात सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे, बंगळूरु, कोलकाता अशा शहरांमध्ये ताणतणावामुळे हृदयविकाराचा झटका आल्याने अधिकाधिक लोक मृत्यूच्या खाईत ढकलले जात आहेत.

तणावापासून दूर राहण्यासाठी काय कराल...
जाणते-अजाणतेपणी आपणही या भाऊगर्दीत सामील झालेले आहोत. पण, तणावावर निश्चितच ताबा मिळवणं शक्य आहे, हे लक्षात ठेवा. नैराश्य, चिडचिड, हृदयविकार, खालावलेली रोग प्रतिकारशक्ती अशी काही लक्षण जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमित व्यायाम, योगासनं, समुपदेशन, मैदानी खेळ यापैंकी जे शक्य असेल... जितक्या वेळ शक्य असेल करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तणावावर नियंत्रण मिळवणं नक्कीच कठिण जाणार नाही.

First Published: Wednesday, April 3, 2013 - 10:49
comments powered by Disqus