गोविंदा पथकाला मुंबई मनपाचा आधार

दहीहंडी तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनात सहभागी होणार्‍यांना महापालिकेने मदतीचा हात दिला आहे. सण साजरे होत असताना गोविंदा पथकात काम करणारे तसंच गणेश विसर्जन करणाऱ्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मुंबई महानगरपालिका त्याच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत देईल.

Updated: Aug 2, 2012, 09:16 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

दहीहंडी तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनात सहभागी होणार्‍यांना महापालिकेने मदतीचा हात दिला आहे. सण साजरे होत असताना गोविंदा पथकात काम करणारे तसंच गणेश विसर्जन करणाऱ्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मुंबई महानगरपालिका त्याच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत देईल. तसंच जखमींवर उपचारासाठी १० हजार रुपयांची मदतही महापालिकेकडून केली जाणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आज याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला.

 

दहीहंडी तसेच गणेश विसर्जन काळात अपघाताची घटना घडल्यास महापालिकेने कार्यकर्त्यांचा विमा काढावा अशी मागणी सार्वजनिक उत्सव मंडळांनी केली होती. याबाबत आयुक्तांनी विमा कंपन्यांकडे चौकशी केली असता ४७ लाख इतका खर्च सांगण्यात आला. मात्र नागरिकांना अपघातासाठी विमा संरक्षण देणे ही बाब महापालिकेच्या स्वेच्छाधीन कर्तव्यात अंतर्भूत नसल्याने आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

मात्र दहीहंडी तसेच गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला केली जाणारी १ लाखाची मदत वाढवून ती दीड लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी, तसंच जखमींना १० हजारांऐवजी १५ हजारांपर्यंतचे उपचार मोफत केले जावेत अशी उपसूचना सभागृहनेते यशोधर फणसे यांनी केली. ही उपसूचनाही मंजूर करण्यात आली असून आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आली आहे.