मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मुंबईच्या अंबोली परिसरातल्या या घटनेनं गुंडांना कशाचीच भीती राहिली नसल्याचं पुन्हा उघड झालं आहे. छेडछाड करणाऱ्यांच्या विरोध करताना तरुणांचा बळी जातो. त्यामुळं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Updated: Nov 4, 2011, 01:34 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

मैत्रिणींची छेड काढणा-या  गुंडांच्या हल्यात संतोष किनन पाठोपाठ हॉस्पिटलमध्ये उपचार घेणा-या रुबेन फर्नांडिसला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळं मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मुंबईच्या अंबोली परिसरातल्या या घटनेत आतापर्यंत १७ जणांना अटक झाली आहे.  याप्रकरणातल्या मुख्य चार आरोपींना आज अंधेरी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

 

मुंबई महिलांसाठी असुरक्षित आहे काय असा प्रश्न पुन्हा विचारला जात आहे. आपल्या मैत्रिणींची छेड काढणा-या गुंडांना विरोध करताना दोन तरुणांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईच्या अंबोली परिसरातल्या या घटनेनं गुंडांना कशाचीच भीती राहिली नसल्याचं पुन्हा उघड झालं आहे. हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर बाहेर पानवाल्याच्या दुकानासमोर गुंडांनी तरुणांसोबत असलेल्या मैत्रिणींची छेड काढली. त्याला संतोष किनन आणि रुबेन फर्नांडीस यांनी विरोध केला. त्यांनी गुंडाशी दोन हात केले. मात्र तयारीत असलेल्या गुंडांनी स्टंप, धारदार चाकूनं हल्ला चढवला.यात असंख्य वार अंगावर झाल्यानं संतोषचा जागीत मृत्यू झाला.

 

घटनेत गंभीर जखमी झालेल्या रुबेन फर्नांडिसला कोकीळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दहा दिवस त्यानं मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चार प्रमुख आरोपींसह १७ जणांना अटक केली आहे.

 

मुंबईत शहर सुरक्षित असल्याचं सांगितलं जातं. मात्र छेडछाड करणाऱ्यांच्या विरोध करताना तरुणांचा बळी जातो. त्यामुळं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  त्याचबरोबर ही हाणामारीची घटना घडत असताना परिसरातून जाणाऱ्यांनी केवळ बघ्याचीच भूमिका घेऊन आपली असंवेदनशीलता दाखवली का, असाही प्रश्न आहे.