कोकणात जाणाऱ्यांच्या गर्दीनं महामार्ग फुलला

गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या वाहनांना गर्दी झाल्याचं चित्र आज सायन-पनवेल मार्गावर पाहायला मिळालं. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना शनिवारपासूनच ही गर्दी दिसून येत आहे. त्यामुळं वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक धिम्यागतीनं सुरू आहे.

Updated: Sep 9, 2013, 04:43 PM IST

www.24taas.com झी मीडिया, मुंबई
गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या वाहनांना गर्दी झाल्याचं चित्र आज सायन-पनवेल मार्गावर पाहायला मिळालं. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना शनिवारपासूनच ही गर्दी दिसून येत आहे. त्यामुळं वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक धिम्यागतीनं सुरू आहे.
रात्रीपासून वाहनांचं प्रमाण वाढल्यानं नवी मुंबईच्या काही भागात वाहतूक खोळंबा नसला तरी तुर्भे, नेरूळ, कळंबोली खारघर या भागात वाहतूक अगदी धिम्यागतीनं चालू आहे. नवी मुंबईच्या पोलिसांनी चोख यंत्रणा ठेवली असल्यानं जर एखादी गाडी बंद पडली तर ती त्वरित बाजूला केली जाण्यात येईल, अशी व्यवस्था केली आहे.
कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळानं ११०० जास्तीच्या गाड्या सोडल्यानं दुपारपासून एसटी महामंडळाच्या गाड्याची गर्दी महामार्गावर दिसत होती. पण काही काळानंतर त्यात काही खाजगी गाड्यांचादेखील समावेष झाला. रात्री मोठ्या प्रमाणात छोट्या खाजगी गाड्या निघाल्यानं अजूनच गर्दी वाढल्याचं दिसतंय. पोलिसांनी आपली यंत्रणा चोख ठेवली असून त्यांचे कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत आहेत.
नवी मुंबई पोलिसांनी दर दोन किलोमीटरवर ‘टाटा मॅजिक’ या गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या गाड्यांमध्ये प्रवाशांना पोलिसांची मदत लागल्यास काही कर्मचारी ठेवले आहेत. अडचण निर्माण झाली तर मदतीसाठी काही साहित्यदेखील ठेवले आहेत. त्याचबरोबर एखादी गाडी बंद पडल्यास ती गाडी बाजूला नेण्यासाठीचं साहित्य ठेवलंय. त्यामुळं वाहतूक व्यवस्था सुरळित चालू आहे.
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर आणि चांगला व्हावा यासाठी वाहतूक पोलीस यंत्रणा प्रयत्न करत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.