'मातोश्री`वरील घडामोडी

आज दिवसभर साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते शिवसेनाप्रमुखांचं निवासस्थान असलेल्या `मातोश्री` बंगल्याकडे.. भावूक शिवसैनिकांची गर्दी, राजकीय नेते, सेलिब्रिटींची गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त असंच याचं स्वरुप होतं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 15, 2012, 09:18 PM IST

www.24taas.com, मुंबई
आज दिवसभर साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते शिवसेनाप्रमुखांचं निवासस्थान असलेल्या `मातोश्री` बंगल्याकडे.. भावूक शिवसैनिकांची गर्दी, राजकीय नेते, सेलिब्रिटींची गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त असंच याचं स्वरुप होतं.
काल रात्रीपासून मातोश्रीवर होती नेत्यांची लगबग... मातोश्रीबाहेर जमले होते शिवसैनिक... आणि प्रत्येकाच्या मनात होता एकच सवाल... साहेब कसे आहेत?..... या घालमेलीतच बुधवारची अख्खी रात्र गेली.... रात्र सरली पण बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलेला शिवसैनिक जागचा हलला नाही.....
गुरुवारी सकाळी सात.....
मुंबईचा मूड नेहमीसारखा नव्हता..... एरवी पहाटेपासूनच गजबजलेल्या दादरमध्ये चक्क शुकशुकाट होता. मातोश्रीच्या बाहेर थांबलेल्या शिवसैनिकांची पावलं पुन्हा एकदा मातोश्रीकडे वळायला लागली. आणि पाहता पाहता जमाव वाढत गेला...
सकाळी आठ....
बाळासाहेबांच्या तब्येत्तीबद्दल कुठलीच अपडेट माहिती मिळत नव्हती. क्षणाक्षणाला टेन्शन वाढत होतं... शिवसैनिकांची वाढती संख्या आणि वातावरणातला तणाव लक्षात घेता शीघ्र कृती दलाच्या तुकड्या सज्ज करण्यात आल्या.
सकाळी १०....
बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दल सगळ्यांच्याच मनात असणा-या असंख्य प्रश्नांना संजय राऊतांनी दिलासा दिला. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे.... आणि ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं त्यांनी झी 24 तासवर सांगितलं. आणि अनेकांच्या मनावरचं दडपण कमी झालं.
सकाळी 11 वाजता
मातोश्रीवर बाळासाहेबांची विचारपूस करायला पोहोचलेले गोपीनाथ मुंडे मातोश्रीमधून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसैनिकांना पुन्हा एकदा चांगली बातमी दिली...
सकाळी 11.15
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, नीलम गो-हे आणि इतर नेते मातोश्रीमधून बाहेर पडले.... बाळासाहेबांच्या या जवळच्या सहका-यांना शिवसैनिक आणि मीडियानं एकच गराडा घातला पण या नेत्यांनी कुणाशीही न बोलता शांतपणे वाट काढणंच पसंत केलं.
दुपारी 1.45 (पावणे दोन वाजता)
शिवसेना नेत्यांचं कुणाशीही न बोलता निघून जाणं सहाजिकच शिवसैनिकांना खटकलं होतं. आणि म्हणूनच पुन्हा दुपारी पावणे दोनच्या सुमाराला मातोश्रीबाहेरची गर्दी वाढायला लागली.
दुपारी 4 वाजता.....
भर उन्हात बाळासाहेबांची खुशाली विचारायला थांबलेल्या शिवसैनिकाची घालमेल वाढत होती.... शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई सगळ्यांना सामोरे गेले.... बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होतेय, तुमच्या प्रार्थनांना यश आलंय, असं देसाईंनी म्हणताच हजारो शिवसैनिकांच्या मनातलं काहूर दूर झालं....
भाऊबीजेच्या दिवशीही हजारो शिवसैनिक घरची दिवाळी सोडून मातोश्रीवर आला होता.... दिवाळीनं जाता जाता शिवसैनिकाला त्याच्या लाडक्या नेत्याची खुशाली कळवली आणि दिवाळीचा शेवटचा दिवस गोड झाला...