सेनेचे मिशन २०१४! विधानसभेवर सेनेचे १०० आमदार

काँग्रेस—राष्ट्रवादीचे बालेकिल्ले फोडून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १०० आमदार निवडून आणायचे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मंत्रालयावर भगवा फडकवण्याचे स्वप्न आपण सारेजण मिळून साकार करूया’, असे आवाहन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 3, 2012, 12:44 PM IST

www.24taas.com, मुंबई
काँग्रेस—राष्ट्रवादीचे बालेकिल्ले फोडून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १०० आमदार निवडून आणायचे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मंत्रालयावर भगवा फडकवण्याचे स्वप्न आपण सारेजण मिळून साकार करूया’, असे आवाहन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची बैठक शुक्रवारी शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी ‘शिवसेनेच्या मिशन २०१४’ जाहीर केले.
यावेळी ते म्हणाले, ‘शिवसैनिकांपासून खासदारांपर्यंत सर्वांनी कामाला लागायला हवे. युतीची सत्ता आलीच पाहिजे. हे स्वप्न साकारण्यासाठी पुढची दोन वर्षे जीवाचे रान करावे लागले तरी चालेल. भात्यात असा बाण ठेवा की त्याने लक्ष्यवेध केलाच पाहिजे. आघाडी सरकारविरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. नाराजीची आग सतत पेटती राहण्यासाठी या नालायक सरकारचे कारनामे लोकांपर्यंत जाऊ द्या. शिवसेना आपली आहे. ती संकटकाळात मदतीसाठी धावून जाते, याची लोकांना जाणीव झाली पाहिजे’.

शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीची चिंता करू नये!
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्येतीची चिंता करू नये. त्यांची काळजी नसावी, असे सांगतानाच उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘आई जगंदबेच्या कृपेने साहेब बरे आहेत. शिवसेनेचा देव संकटात आहे? असे आम्हाला विचारले जाते. त्यावर आमचे म्हणणे आहे, ‘देव संकटात कधीच नसतो. उलट तो भक्तांच्या संकटांचे निवारण करत असतो. विरोधकांना वाटते तशी काही साहेबांची तब्येत नाही. शिवसेनाप्रमुख लवकरच त्यांना आपल्या रोखठोक भाषेत उत्तर देतील.
माझ्याही तब्येतीची लोक विचारपूस करतात. पण शरीराच्या मेंटनन्सचेही विविध टप्पे असतात. डागडुजी सुरू आहे. मी तुमच्यासमोर आहे आणि आता जानेवारीपासून महाराष्ट्रातही फिरणार आहे. याचा अर्थ माझीही प्रकृती चांगली आहे’, असेही उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले.