उद्धव-राज भेटीचा अन्वयार्थ...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र आले... एकमेकांच्या शेजारी बसले, एकमेकांशी गप्पा मारल्या... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुस-या स्मृतीदिनी शिवाजी पार्कवर हे चित्र दिसलं... ठाकरे बंधूंच्या या भेटीचा नेमका अन्वयार्थ काय...? पाहूयात हा विशेष रिपोर्ट...

Updated: Nov 17, 2014, 07:47 PM IST
उद्धव-राज भेटीचा अन्वयार्थ... title=

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र आले... एकमेकांच्या शेजारी बसले, एकमेकांशी गप्पा मारल्या... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुस-या स्मृतीदिनी शिवाजी पार्कवर हे चित्र दिसलं... ठाकरे बंधूंच्या या भेटीचा नेमका अन्वयार्थ काय...? पाहूयात हा विशेष रिपोर्ट...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे... एक शिवसेनेचा प्रमुख, तर दुसरा मनसेचा सरसेनापती... एक दक्षिण ध्रुव तर दुसरा उत्तर ध्रुव... पण या दोन्ही ध्रुवांना जोडणारा समान दुवा म्हणजे बाळासाहेब ठाकरे... उद्धव आणि राज यांना एकत्र आणण्याची ताकद कुणामध्ये असेल, तर ती बाळासाहेबांमध्येच, हे सोमवारी पुन्हा एकदा सिद्ध झालं... 

बाळासाहेब ठाकरेंच्या दुस-या स्मृतीदिनाच्या निमित्तानं शिवाजी पार्कवर जमलेल्या हजारो शिवसैनिकांना चमत्कार पाहायला मिळाला... एरव्ही एकमेकांना चिमटे काढणारे ठाकरे बंधू.... सोमवारी चक्क एकमेकांच्या शेजारी बसल्याचं चित्र उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं... ते केवळ शेजारी बसले नव्हते, तर एकमेकांशी हसत गप्पाही मारत होते... जे दृश्यं पाहण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक केव्हापासून आस लावून बसले होते, त्यांची इच्छापूर्ती शिवाजी पार्कवर झाली होती... 

शेवटी राजकारणापेक्षा रक्ताची नातीच घट्ट असतात, हे वास्तव उद्धव-राज भेटीनं पुन्हा अधोरेखित झालं.... यापूर्वी उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये असताना, त्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे गेले होते. उद्धवनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर, राज यांनी स्वतः गाडी ड्राइव करून त्यांना मातोश्रीवर नेले... अलिकडेच राज ठाकरेंची कन्या उर्वशी हिला अपघात झाला, तेव्हा उद्धव आणि रश्मी ठाकरे यांनी हिंदूजा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिची विचारपूस केली... रक्ताची नाती तुटता तुटत नाहीत, हेच खरं...

आता उद्धव आणि राज या दोघा चुलत बंधूंमध्ये नेमकी काय चर्चा रंगली होती, ते सांगता येत नाही... पण त्यांच्या एकत्र येण्यामुळं अनेक शक्यतांना नव्याने धुमारे फुटलेत... उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याचं चित्र राजकीय पटलावरही दिसणार का? नव्या राजकीय समीकरणांची ही नांदी मानायची का? अशा चर्चांना पुन्हा उधाण आलंय... यापूर्वी उद्धव ठाकरेंनी टाळी देण्यासाठी हात पुढे केला होता. पण तेव्हा राज ठाकरेंनी आपला हात आखडता घेतला... 

गेल्यावर्षी बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतीदिनी श्रद्धांजली वाहण्यासाठी राज ठाकरे शिवाजी पार्कात आले नव्हते. स्मृतीस्थळापासून राज ठाकरेंचं घर अवघ्या 100 पावलांवर आहे, त्यामुळं त्यांची गैरहजेरी प्रकर्षानं जाणवली. अगदी राज ठाकरेंच्या फॅमिलीपैकीही कुणी श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलं नाही... शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेबांचं स्मारक उभारण्यास मनसेनं विरोधही केला होता. यंदा मात्र वेगळंच चित्र शिवाजी पार्कात दिसलं... 100 पावलांचं अंतर राज ठाकरेंनी सहज पार केलं....

विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मनसेची हार झाली... या बदललेल्या राजकीय परिस्थितीत उद्धव आणि राज यांनी एकत्र येणं ही अपरिहार्यता बनलीय का? शिवसेना आणि मनसेनं सोबत येण्यामध्येच दोन्ही पक्षांचं हित सामावलं आहे का? भाजपमधील अमित शाह नावाचं आव्हान थोपवण्यासाठी उद्धव आणि राज यांचं मनोमीलन आवश्यक आहे का? आणि मुंबई, ठाणे, नाशिक महापालिका या ऑक्सिजन लाइन्स टिकवून ठेवण्यासाठी एकत्र येणं, ही दोन्ही पक्षांची गरज बनलीय का?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.