मुंबईच्या खड्ड्यांवर उद्धव ठाकरेंची दिलगिरी!

मुंबईतल्या खड्ड्यांमुळे सगळीकडे ओरड होत असताना आता खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. उद्धव ठाकरे यांनी पालिकेतल्या पदाधिकाऱ्यांसह या कामाची पहाणी करत मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय.

शुभांगी पालवे | Updated: Jul 30, 2013, 09:27 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या खड्ड्यांमुळे सगळीकडे ओरड होत असताना आता खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. उद्धव ठाकरे यांनी पालिकेतल्या पदाधिकाऱ्यांसह या कामाची पहाणी करत मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. खड्ड्यांवरुन महाभारत सुरु असताना गेल्या वर्षीपेक्षा यंदा रस्त्यांची कामं चांगली झाली आहेत, असं मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्यही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलंय.
मुंबई बुडाली खड्ड्यांमध्ये अशी म्हणण्याची वेळ आलीय. सर्वच स्तरांवर जागोजागी पडलेल्या खड्यांविरुद्ध तीव्र असंतोष व्यक्त होतोय. महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेलाही या रोषाला सामोरं जावं लागतंय. त्याचीच दखल घेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि अतिरीक्त आयुक्त श्रीनिवासन यांच्यासह खड्डे बुजवण्याच्या कामांची पहाणी केली. विलेपार्ले, जोगेश्वरी, कलिना रोड परिसराचा त्यांनी दौरा केला. खड्ड्यांमुळे होत असलेल्या त्रासाबद्दल मुंबईकरांची दिलगिरी त्यांनी व्यक्त केली. पावसाळ्यापूर्वीच्या कामामध्ये दिरंगाई झाल्याची कबुली देत खड्ड्यांच्या समस्येला एकटी शिवसेना जबाबदार नाही, हे सांगायला मात्र ते विसरले नाहीत. पावसाळ्यापूर्वीच्या कामांमध्ये दिरंगाई झाल्याची कबुलीही त्यांनी दिली मात्र त्यानं मुंबईकरांचा संताप शमणार नाही. रस्ते चकाचक कधी होणार याच सामान्यांचा सवाल आहे.

कंत्राटदारांवर कारवाई होणार, त्यांना ब्लॅकलिस्ट करणार अशी नेहमीची पठडीतल्या आश्वासनांनी मुंबईकरांचा राग शांत होणार नाहीये. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या खड्डेदर्शन दौऱ्यामुळे वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली होती. त्यामुळं वाहनधारकांच्या वैतागात भर पडली. उद्धव यांच्या या दिलगिरीवरुन सत्ताधाऱ्यांना मुंबईकर माफ करतील अशी स्थिती अजिबात नाही. रस्ते चकाचक झाल्याशिवाय आता नागरिकांचा संताप शमणार नाही, हेचं खरं... शिवसेनेनं `करुन दाखवलं` अशी बॅनरबाजी करत विकासकामांचं श्रेय घेतलं होतं. सध्याची खड्डेमय मुंबई पाहता हेच का करुन दाखवलं? असा सूर सामान्यांमधून उमटतोय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.