व्हॅलेन्टाईन स्पेशल : प्रेम काय असतं... ते यांच्याकडे पाहून लक्षात येईल!

त्यांनी प्रेम केलं... लग्नंही केलं... मात्र, हे जोडपं तुमच्या आमच्या सारखं  निश्चितच नाही... काहीतरी वेगळं, नवा विचार मांडणारं, नात्याची नवीन परिभाषा सांगणारं असं हे जोडपं आहे... सुपर्णा आणि प्रदीप जोशी यांच्या अनोख्या नात्याची, प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी...

Updated: Feb 10, 2017, 04:01 PM IST
व्हॅलेन्टाईन स्पेशल : प्रेम काय असतं... ते यांच्याकडे पाहून लक्षात येईल!

मुंबई : त्यांनी प्रेम केलं... लग्नंही केलं... मात्र, हे जोडपं तुमच्या आमच्या सारखं  निश्चितच नाही... काहीतरी वेगळं, नवा विचार मांडणारं, नात्याची नवीन परिभाषा सांगणारं असं हे जोडपं आहे... सुपर्णा आणि प्रदीप जोशी यांच्या अनोख्या नात्याची, प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी...

मुंबईतल्या सायन परिसरात राहणारं हे जोडपं... इतरांना प्रेरणा मिळावी असं या जोडीचं कतृत्व... खरंतर जन्मत:च 'आर्थोग्रायफोसिस'ने ग्रस्त असलेल्या सुपर्णा जोशीचं बालपण खूपच त्रासदायक होतं... जन्मत:चं शरीराने व्यंग असलेल्या सुपर्णाला तिच्या न शिकलेल्या आईने धडपडीने वर काढलं. 

जवळपास तिच्या शरीरावर 20 ते 25 शस्त्रक्रिया केल्यानंतर तिचं शरीर काहीसं सर्वसामान्य माणसासारखं होऊ शकलं. शाळेत जाणं तिला शक्य होऊ शकलं नाही म्हणून घरातूनच शिक्षण देण्याचं तिच्या आईने ठरवलं. त्यासाठी घरी येऊन तिला एक शिक्षिका शिकवत होत्या. त्यानंतर मात्र तिला शाळेत प्रवेश मिळाला आणि सुपर्णा शाळेत जाऊ लागल्या. दहावीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतरही पुढे शिकावं, या आईच्या हट्टापायी तिने महाविद्यालयातही प्रवेश घेतला.

टायपिंग, कम्युटर ऑपरेटरचं प्रशिक्षण घेऊन हळूहळू सुपर्णाने अर्थाजनाच्या दृष्टीनेही सुरुवात केली. या सगळ्यासाठी तिची आई सावलीसारखी खंबीरपणे तिच्या पाठिशी होती. आपल्यानंतर मुलीचं काय होईल? या चिंतेने मात्र ती दुखी व्हायची. मात्र, विधात्याने तिच्यासाठी तीदेखील सोय केली होती... आणि म्हणूनच तिची ओळख झाली ती प्रदीप जोशी या अवलियाशी...

संगीत, नाटक, सिनेमा आणि समाजसेवा करणाऱ्या या अवलियाने सुपर्णाच्या शारीरिक व्यंगाकडे न पहाता तिच्यातले नेमके गुण हेरले आणि तिला लग्नाची मागणी घातली... स्व:तमध्ये कोणतंही व्यंग नसतानाही त्याने घातलेली मागणी सुपर्णाला सुरुवातीला मान्य नव्हती... मात्र, जवळपास सात ते आठ वर्षांच्या ओळखीचं रुपांतर नंतर मात्र लग्नगाठीत झालं... आणि सुपर्णा-प्रदीप यांचा संसार सुरु झाला.

यातही अनेक चढ-उतार सुपर्णा आणि प्रदीप यांनी पाहिले. मात्र, डगमगून न जाता एकमेकांच्या साथीने त्यांचा संसार सुरु आहे. आज प्रदीप आपलं व्यावसायिक काम बघत असताना सुपर्णाचीही योग्य पद्धतीने काळजी घेतात तर सुपर्णाही आपला संसार सांभाळत व्यावसायिकरित्या सक्षमपणे उभं राहण्याचा प्रयत्न करतेय. एकूणच या दोघांना पाहिलं की वाटतं, प्रेमाची परिभाषा इथे प्रत्येकाची वेगळी असते... जीवनाचं अंतिम सत्य मात्र 'प्रेम' हेच असते... याच प्रेमाच्या जोरावर आपलं जीवन आनंदाने जगणाऱ्या या जोडप्याला आमचा लाख लाख सलाम!