विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा...

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाचा आजचा दिवस गाजला तो विदर्भातल्या अतिवृष्टीच्या मुद्यावरून...ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मुद्यावरून विदर्भातल्या सर्वपक्षीय आमदारांनी आज विधानसभेत रणकंदन केलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 22, 2013, 11:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाचा आजचा दिवस गाजला तो विदर्भातल्या अतिवृष्टीच्या मुद्यावरून...ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मुद्यावरून विदर्भातल्या सर्वपक्षीय आमदारांनी आज विधानसभेत रणकंदन केलं. सरकारनं नुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी २५ हजारांची मदत जाहीर करूनही विदर्भातल्या आमदारांचं समाधान झालं नाही. त्यामुळं दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
विदर्भात अतिवृष्टीने हाहाकार उडाला आहे. अतिवृष्टीमुळे विदर्भात आतापर्यंत 49 जणांचे बळी घेतले आहेत, तर 48 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झालंय. याबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. विदर्भात पावसाने केलेल्या हाहाकारामुळे सरकारनं विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत लावून धरली. या मागणीसाठी आमदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरात 4 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.
विदर्भातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालेल्या शेतक-यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्याची घोषणा पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी केली. शिवाय आमदारांचा आक्रमकपणा बघून मुख्यमंत्र्यांनी विदर्भात शनिवारी आणि रविवारी दौरा करण्याचं जाहीर केलं. विदर्भातील शेतीच्या नुकसानीचं सर्व्हेक्षण करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

पण तरीही विदर्भातील आमदारांचे समाधान झालं नाही. याबाबतची लक्षवेधी राखून न ठेवल्यानं आमदारांची घोषणाबाजी आणखी वाढली. या गोंधळातच पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आणि दुपारीच विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.