...तर चीनलाही मागे टाकू- रतन टाटा

व्यापार आणि उद्योगांच्या बाबतीत जर भारत सरकारने भारतीय व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं, तर भारतीय उद्योग चीनसारख्या देशालाही सहज मागे टाकू असं आत्मविश्वासपूर्ण वक्तव्य करताना प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी देशातील लाल फितीच्या कारभारावर टीका केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 9, 2012, 04:53 PM IST

www.24taas.com, मुंबई
व्यापार आणि उद्योगांच्या बाबतीत जर भारत सरकारने भारतीय व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं, तर भारतीय उद्योग चीनसारख्या देशालाही सहज मागे टाकू असं आत्मविश्वासपूर्ण वक्तव्य करताना प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी देशातील लाल फितीच्या कारभारावर टीका केली आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस रतन टाटा टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहेत. त्यांनी ‘फायनान्शल टाइम्स’ला दिलेल्या खास मुलाखतीत आपली व्यथा बोलून दाखवली. ‘भारतामध्ये उद्योगपतींची अडवणूक केली जाते आणि त्यांच्या कामांना सरकार दरबारी विलंब लागत असल्यामुळे भारत हा उद्योगांमध्ये इतर देशांना टक्कर देऊ शकत नाही, असं ते म्हणाले. तसंच सरकारी नियम, त्यासंबंधीचे कायदे आणि त्यावर होत राहाणारे वाद यामुळे अनेक प्रकल्पांना मान्यता मिळत नाही किंवा मान्यता मिळण्यास अनेक वर्षं लागतात.’ असं रतन टाटा या वेळी म्हणाले.
इतर राष्ट्रांमध्ये उद्योगांसंधीचे निर्णय काही आठवड्यांत अथवा महिन्यांत घेतले जातात. आपल्या देशात मात्र असे निर्णय घ्यायला ८ ते १० वर्षं लागतात. या काळात इतर उद्योग समुह आपल्या खूप पुढे निघून गेले असतात. तसंच पंतप्रधान आणि संबंधित खात्यांचे मंत्री यांच्या विचारांत बऱ्याच वेळेला एकवाक्यता नसल्यामुळे निर्णय प्रक्रिया मंदावते. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतातील उद्योग प्रगती करू शकत नाहीत. अशी खंत टाटा यांनी व्यक्त केली.