…जेव्हा पोलीसच बनतात आयकर अधिकारी!

मुंबईतील व्ही पी रोड येथील एका अंगडिया व्यापाऱ्यावर बनावट छापा टाकून त्या व्यापाऱ्याकडून लाखो रुपये उकळायच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 3, 2013, 01:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील व्हीपी रोड येथील एका अंगडिया व्यापाऱ्यावर बनावट छापा टाकून त्या व्यापाऱ्याकडून लाखो रुपये उकळायच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. इन्कम टॅक्सचे आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी सांगून ही टोळी व्यापाऱ्यांकडून पैसा उकळायचा... विशेष म्हणजे यात चार मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्सटेबल आहेत.
स्पेशल छब्बीस या सिनेमातला हा प्रकार खराखुरा घडलाय आणि हा प्रकार करणारे आहेत कॅमेऱ्यासमोर तोंड लपवणारे हे आरोपी... हे सगळे ठग व्हीपी रोडमधल्या एका अंगाडिया व्यापाऱ्याकडे गेले. त्याच्याकडे ३५ कोटी रुपये काळा पैसा आहे, असं सांगत त्याला धमकावलं आणि खंडणी मागू लागले. इन्कम टॅक्स आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचा बनाव त्यांनी केला, अशी मीहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिलीय.
अंगडियाकडे छापा टाकल्यानंतर या बनावट अधिकाऱ्यांनी त्या व्यापाऱ्याच्या दुकानाची झड़ती घेतली. पण, काहीच सापडत नसल्यानं, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. धक्कादायक बाब म्हणजे या सहा जणांच्या टोळीतले चौघे जण हे मुंबई पोलीस दलात ‘लोकल आर्म्स’ खात्यातले चार पोलीस कॉन्स्टेबल आहेत.

इन्कम टॅक्सचे आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी समजून तो अंगडिया व्यापारी या टोळीला दोन लाख रुपये द्यायला तयारही झाला होता. पण, अचानक त्या व्यापाऱ्यानं एका मित्राला घडलेला सर्व प्रकार सांगून त्याचा सल्ला घेतला. त्या मित्रानं पोलिसांना फोन केला आणि सगळं बिंग फुटलं. पोलिसांनी शंकर चव्हाण, गणेश काते, अमर नवले आणी हमिद सय्यद या चार पोलीस कॉन्स्टेबल्सना आणि इतर दोन जणांना अटक केलीय.