ताडोबाच्या जंगलात`वाघिणीचं दूध`!

चंद्रपूरच्या ताडोबा अभयआरण्याला भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांचे लवकरच इंग्रजीतून स्वागत केले जाणार आहे. ताडोबामध्ये काम करणा-या गाईड्सना सध्या इंग्रजी प्रशिक्षणाचे धडे दिले जातायत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 23, 2013, 08:19 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्याला भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांचे लवकरच इंग्रजीतून स्वागत केले जाणार आहे. ताडोबामध्ये काम करणा-या गाईड्सना सध्या इंग्रजी प्रशिक्षणाचे धडे दिले जातायत. या वर्गात प्रशिशिक्त झालेले गाईड पर्यटकांना इंग्रजीतून माहिती देण्यासाठी सज्ज झालेत. इंग्रजीला `वाघिणीचं दूध` म्हटलं जातं. कारण ही भाषा आत्मसात झाली, की परदेशी व्यक्तींशी संवाद साधण्यातील अडचण दूर होते.
मोर - Peacock, गरुड-Eagle, वाघ-Tiger, बिबट्या-Leopard इथवर ठीक आहे मात्र रानगवा , नीलगाय, चितळ, सर्प गरुड, टकाचोर अशांसारख्या ताडोबातील हजारो वन्यजीवांच्या नावांचे इंग्रजी पर्याय काय? एखाद्या पर्यटकाने याची इंग्रजी नावे विचारली तर? देश-विदेशातील पर्यटकांना ताडोबाची सफर घडविताना इथल्या स्थानिक व आदिवासी गाईड्सना इंग्रजी संवादाचा सराव नसल्याने कित्येकदा अडचण यायची. ही अडचण दूर करण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या गाईड्ससाठी इंग्रजी प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आलाय. ताडोबाचे सौंदर्य विदेशी पर्यटकांना खुलवून सांगण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाची मोठी मदत होणार असल्याचं वनअधिकाऱ्यांनी सांगितलं.
ताडोबाच्या नव्या हंगामात ऑनलाईन आरक्षणाचा फायदा घेत हजारो देशी-विदेशी पर्यटक इथे दाखल होणार आहेत. ऑनलाईन यंत्रणा सुरु होऊन काही दिवस लोटत नाहीत तोच २ महिन्यांचे आगाऊ आरक्षण फ़ुल्ल झाले आहे. त्यामुळे या विदेशी पर्यटकांचे अस्खलित इंग्रजीतून स्वागत करण्याचा निर्धार या स्थानिक गाईड्सनी केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.