`लाजवाब` पाणीपुरी... किळसवाणा प्रकार उघड!

By Shubhangi Palve | Last Updated: Wednesday, October 23, 2013 - 20:48

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
ठाण्याच्या पाणीपुरी विक्रेत्याचा किळसवाणा प्रताप ‘झी मीडिया’ने यापूर्वी उघडकीस आणला होता. ते प्रकरण अजूनही सर्वसामान्यांच्या स्मरणात असतानाच असाच आणखी एक धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आलाय. नागपूरचा एक विक्रेता ग्राहकांना पाणीपुरी खायला देताना अत्यंत सडलेला आणि निकृष्ट दर्जाचा बटाटा वापरत असल्याचं ‘झी मीडिया’ला आढळलंय.
सडके आणि कुजलेले बटाटे तुम्हाला खायला दिले तर... तुम्ही ते नक्कीच खाणार नाही. पण,पाणीपुरीच्या माध्यमातून ते तुमच्या पोटात जात असतील तर... एकतर सडके अन्न आणि ते देखील पैसे मोजून खायचं... सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सर्रास आणि बेमालूमपणे नागपुरात सुरु आहे. `लाजवाब` पाणीपुरीच्या माध्यमातून हा सडका बटाटा नागपूरच्या नंदनवन भागात राहणाऱ्या दोघांनी खाल्ला आणि त्यांची प्रकृतीच बिघडली.
या घटनेची माहिती आधी पोलीस ठाणे आणि नंतर अन्न व औषधी प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई केली. सडका आणि कुजलेला बटाटा जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला. मुळचा मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर जिल्ह्यातील राहणारा विनोद ठाकूर नावाचा हा पाणीपुरी विक्रेता आहे. त्याचा हातठेला जप्त करण्यात आला असून एफडीए प्रशासन त्यावर फूड सेफ्टी कायद्याअंतर्गत कारवाई करणार आहे.

हा किळसवाणा प्रकार कळल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक कार्यकर्ते तिथे पोहोचले. नागपुरात असा प्रकार परत आढळल्यास त्यावर मनसे स्टाईलने कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. ‘एफडीए’ची कारवाई होईल तेव्हा होईल, परंतु रस्त्यावर उघड्यावरील खाद्यपदार्थ खाताना नागरिकांनाही खबरदारी बाळगण्याची गरज आहे. कारण आज ना उद्या, त्याचा फटका तुमच्या-आमच्या सारख्या पाणीपुरीप्रेमींनाच बसणार आहे.
व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Wednesday, October 23, 2013 - 20:46


comments powered by Disqus