नागपूरमध्ये आग, एकाच कुटुंबाचे ५ जणांचा होरपळून मृत्यू

नागपूरच्या गोकुळपेठ परिसरात एका इमारतीला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीला आग लागल्यावर लिफ्टने खाली उतरण्याच्या प्रयत्नात हे सर्व व्यक्ती होरपळून मृत्यूमुखी पडले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 23, 2014, 09:39 AM IST

www.24taas.com, अखिलेश हळवे, झी मिडिया, नागपूर
नागपूरच्या गोकुळपेठ परिसरात एका इमारतीला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीला आग लागल्यावर लिफ्टने खाली उतरण्याच्या प्रयत्नात हे सर्व व्यक्ती होरपळून मृत्यूमुखी पडले. मृतांमध्ये ३ महिला आणि २ लहान मुलांचा समावेश आहे. पार्किंग मध्ये ठेवलेल्या दुचाकी गाड्यांना लागलेल्या आगीमुळे ही घटना घडली. पण या गाड्यांना आग कशी लागली ते मात्र अजून स्पष्ट झाले नाही, असे नागपूर महानगर पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले.
पश्चिम नागपुरातील गोकुळपेठ भागातील याच अजिंक्य प्लाझा नावाच्या इमारतीला आज मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या इमारतीतील तळ मजल्यावरील पार्किंग मध्ये रात्री सव्वा बाराच्या सुमारास आग लागली. आगीत पार्किंग मध्ये ठेवलेल्या १० पेक्षा जास्त दुचाकी गाड्या जळाल्यात. आगीमुळे काही वाहनांचे तयार फुटले आणि त्यामुळे झालेल्या आवाजाने अजिंक्य प्लाझा मधील निवासी जागे झाले. बहुतांशी लोकांनी आगी पासून वाचण्यासाठी वरच्या मजल्याकडे धाव घेतली, तर काही शेजारच्या इमारतींवर उडी मारून पाळले आणि आपला जीव वाचवला. पण या धावपळीत गोंधळलेल्या पहिल्या माळ्यावर राहणाऱ्या सिरिया कुटुंबाने लिफ्टकडे धाव घेतली. पहिल्या माळ्यावरून हे कुटुंब तळ मजल्यावर आले आणि तीच त्यांची जीवघेणी चूक ठरली.
तोवर तळ मजल्यावर आग पसरली असल्यामुळे लिफ्ट मध्ये आग पोहोचली होती. आगीच्या या रौद्र रुपात सिरीया कुटुंबाचे ५ सदस्य होरपळून मृत्यूमुखी पडले. सलीला सिरिया ( ६५ वर्ष ), रागिणी सिरिया ( ३२ वर्ष ), निरांश सिरिया ( ३ वर्ष - रागिणी यांचा मुलगा ), श्रुती माली ( ३० वर्ष - सालीला सिरीयाची विवाहित मुलगी ) आणि शाहना माली ( २ वर्ष - श्रुती यांची मुलगी ) लिफ्ट मधेच होरपळून मृत्युमुखी पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. त्यांनी लगेच आग विझविली. मात्र, संपूर्ण इमारतीची पाहणी केल्यानंतर लिफ्ट मध्ये हे ५ मृतदेह आढळले. अग्निशमन दलाच्या मते ही आग कशी पसरली हे स्पष्टपणे सांगणे कठीण आहे. मात्र हे दुचाकी जाळण्याचे प्रकरण नाकारता येत नाही असे अग्निशमन दलाने म्हंटले आहे.
या इमारतीत एकूण १३ flats असून त्यापैकी १० flats मध्ये रहिवासी असून ३ रिकामे आहेत. जीवाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेने त्या भागात खळबळ माजली आहे. आता आग नेमकी कशी लागली याचा तपास केला जाणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.