नाशिककरांनो, डोळ्यांत तेल घालून मुलांची काळजी घ्या!

नाशिकमधल्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... शहरात गेल्या आठ दिवसांमध्ये पाच लहान मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न झालाय. यामधल्या दोन मुलांनी प्रसंगावधान दाखवून आपली सुटका करुन घेतली...

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 2, 2013, 09:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमधल्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी... शहरात गेल्या आठ दिवसांमध्ये पाच लहान मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न झालाय. यामधल्या दोन मुलांनी प्रसंगावधान दाखवून आपली सुटका करुन घेतली...
नाशिकमध्ये अपहरणाचे प्रकार वाढले आहेत. आठ दिवसांत मुलांच्या अपहरणाचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यातलीच एक म्हणजे सहावीच्या वर्गात शिकणारी श्रावस्ती मोहिते.. दोन दिवसांपूर्वी तिचं सिडकोमधल्या शाळेसमोरून मारुती व्हॅनमधून अपहरण करण्यात आलं होतं.
रोजचीच व्हॅन आपल्याला न्यायला आली, असं समजून श्रावस्ती गाडीत बसली... अर्ध्या तासानं अपहरणकर्ते सिगरेट ओढण्यासाठी खाली उतरले, तीच संधी साधत या चिमुरडीनं गाडीतून पळ काढला. आणि पुढचा अनर्थ टळला. मात्र या गंभीर घटनेनंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यायला दोन दिवस लावले.
गेल्या आठ दिवसात पंचवटी परिसरातल्या पुणे विद्यार्थी वसतीगृहातून दोन विद्यार्थी बेपता झालेत. त्यातील हृषीकेश आवरे हा विद्यार्थी जखमी अवस्थेत सापडला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच त्याच वसतीगृहातून उत्तम वायकांडे हा विद्यार्थीही बेपत्ता झालाय. आडगाव आणि सरकारवाडा परिसरातही असेच गुन्हे दाखल झालेत.
या घटनांमुळं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. पोलिसांनी हे सगळं गांभीर्यानं घ्यावं, ही अपेक्षा आहेच पण पालकांनीही मुलांना शाळेत पाठवताना काळजी घ्यायला हवी.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.