मृत्यूंजय : अवघ्या २८व्या वर्षी पचवल्या आठ बायपास!

वय वाढलं की, साधारणपणे हृदयरोगाचा धोकाही वाढतो, मग बायपास सर्जरी करावी लागते... परंतु, नाशिकच्या एका तरूणावर २८ व्या वर्षीच बायपास सर्जरी करावी लागलीय. तीदेखील तब्बल आठ वेळा... एवढ्या बायपास सर्जरी करणारा हा नाशिककर कदाचित जगातील सर्वांत तरूण पेशंट असावा.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 24, 2014, 08:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,
वय वाढलं की, साधारणपणे हृदयरोगाचा धोकाही वाढतो, मग बायपास सर्जरी करावी लागते... परंतु, नाशिकच्या एका तरूणावर २८ व्या वर्षीच बायपास सर्जरी करावी लागलीय. तीदेखील तब्बल आठ वेळा... एवढ्या बायपास सर्जरी करणारा हा नाशिककर कदाचित जगातील सर्वांत तरूण पेशंट असावा.
वय वर्षे २८... आणि ८ बायपास सर्जरी
आठ बायपास सर्जरी झालेला जगातील सर्वात तरूण पेशंट
तरूणपणीच जडलाय हृदयरोगाचा प्राणघातक विकार
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये आठ ब्लॉकेज

नाशिकच्या जेल रोड परिसरात राहणारा प्रशांत पवार... महापारेषण कंपनीत अभियंता म्हणून काम करतो. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्यानं त्यानं अँजिओग्राफी केली, तेव्हा त्याच्या हृदयात एक, दोन, तीन नव्हे तर तब्बल अर्धा डझनहून अधिक ब्लॉकेजेस आढळले. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये हे ब्लॉकेजेस होते. या तरूणाचं वय आहे फक्त २८ वर्ष... पण ७० वर्षांच्या वयोवृद्धाच्या हृदयासारखी त्याच्या हृदयाची वाईट अवस्था झालेली... प्रशांतनं नाशिकच्या अनेक हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरांशी संपर्क साधला. मात्र, एवढी किचकट आणि गुंतागुंतीची, नाजूक शस्त्रक्रिया करण्यास अनेकांनी हात आखडता घेतला... अखेर तो उपचारासाठी मुंबईत दाखल झाला.
मुंबईत पुन्हा तपासण्या करताना त्याच्या हृदयात आठ ब्लॉकेजेस आढळून आले. त्यापैंकी तीन ब्लोकेजेस ४० टक्के, तीन ब्लॉकेजेस ७० टक्के तर एक ब्लॉक शंभर टक्के बंद होता. म्हणजेच परिस्थिती एकदम गंभीर होती... अगदी प्राणांशी गाठ... प्रशांतच्या जेनेटिक्समध्ये कोलेस्टेरॉल लेव्हल सातत्याने वाढतंच होतं... प्रशांतचे वडिलही पन्नाशीतच हार्ट अटॅकने वारले होते. अशा परिस्थितीत मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. नाशिकच्या प्रशांतने आपल्या हृदयावर एक, दोन नव्हे, तर तब्बल आठ घाव झेलले.
जगात अशा पद्धतीचं हृदय खूपच दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. मात्र, सुदैवाची बाब म्हणजे हृदयरोगाची समस्या अनुवांशिक असली तरीही सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे रूग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो, असा विश्वास त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करणारे ख्यातनाम कार्डिअॅक सर्जन डॉ. रमाकांत पांडा यांनी व्यक्त केला. भारतातील अशा प्रकारची ही पहिलीच जटील शस्त्रक्रिया असल्याचं त्यांनी सांगितलं.
गोड बातम्यांचा डबल धमाका....
प्रशांत पवार आता पुन्हा एकदा महापारेषणमध्ये ड्युटी जॉईन करणार आहे. कंपनीने त्याच्या या गंभीर आजारासाठी साडे सहा लाख रूपयांचा खर्च केलाय. याच कंपनीत राहून त्याला आता अपार कष्ट करून मोठ्या हुद्द्यावर पोहोचायचंय. प्रशांतच्या हृदयावर सर्जरी सुरू असतानाच, त्याची पत्नी प्रसववेदना सहन करत होती. हॉस्पिटलमधून सुखरूप डिस्चार्ज घेताच आपण बाप झाल्याची गोड बातमी त्याला मिळाली. बायको बाळंतपणासाठी माहेरी गेल्यानं त्यानं अद्याप आपल्या नवजात मुलाला पाहिलेलं नाही. आनंदाचा डबल डोस पवार कुटुंबीयांनाही सुखावून गेलाय.
आधुनिक तंत्रज्ञान उपचारांमुळे आता हृदयरोगावरही उपचार होऊ शकतात. परंतु, आपल्याला असा आजार जडल्याच्या भीतीनेच अनेक जण हातपाय गाळून बसतात. प्रशांतसारखी हृदयरोगाशी दोन हात करण्याची जिद्द असेल तर मृत्यूवरही सहज मात करता येते. त्या दृष्टीनं आठ बायपास सर्जरी झेलणाऱ्या प्रशांत पवारला मृत्यूंजयच म्हणावं लागेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.