नगर-पुणे अपघातात ५ ठार

अहमदनगर-पुणे रस्त्यावर शिक्रापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर पाच जण जबर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 18, 2013, 12:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नगर

अहमदनगर-पुणे रस्त्यावर शिक्रापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर पाच जण जबर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.
अमरावती शहराचे उपअधीक्षक दिनकर शामराव महाजन हे जळगावहून पुण्याच्या दिशेने आपल्या कारने येत होते. ते स्वत:च गाडी चालवत होते. त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जोरदार धडकली.
गाडीने कंटेनरला दिलेली धडक एवढी जबरदस्त होती की त्यात महाजन यांची पत्नी मिनाक्षी महाजन (४५) आणि मिनाक्षी यांचे वडील राजाराम ज्ञानदेव गायकवाड (७३, रा. वाकडी, ता. जामनेर, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच त्यांनी दिलेल्या धडकेने शिरूर येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयातून परतणाऱ्या बारावीच्या तीन विद्यार्थिनींपैकी वर्षा भानुदास गायकवाड (१८) हिचाही जागीच मृत्यू झाला. तर कंटेनर दुरुस्त करणारे किसनलाल तान्हाराम कुमार आणि त्याचा भाऊ महेंदर कुमार (दोघे रा. राजस्थान) यांचाही जागीच मृत्यू झाला.

या अपघातात महाजन यांचे मेव्हणे सुनील राजाराम गायकवाड आणि रुपाली उभे (१८), कमल कोकरे (१८) या विद्यार्थिनींसह अन्य दोघे जखमी झाले आहेत. जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.