राज ठाकरेंनी तंबी देताच ते लागलेत चक्क कामाला

नाशिक महानगर पालिकेच्या कारभाराबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  नाराजी व्यक्त  केल्यानंतर मनसेचे  पदाधिकारी कामाला लागलेत. रोजच्या बैठका आणि पाहाणी दौरे करून नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यायला सुरूवात केलीय.

सुरेंद्र गांगण | Updated: Jan 26, 2014, 05:18 PM IST

www.24taas.com झी मीडिया,नाशिक
नाशिक महानगर पालिकेच्या कारभाराबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  नाराजी व्यक्त  केल्यानंतर मनसेचे  पदाधिकारी कामाला लागलेत. रोजच्या बैठका आणि पाहाणी दौरे करून नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यायला सुरूवात केलीय.
मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरु झालेल्या मोहिमेत किती सातत्य राहणार असा सवाल उपस्थितीत होतोय. नाशिकचे महापौर, स्थायी समिती सभापती, स्थानिक नगरसेवक आणि अधिकारीचा यांचा हा  लवाजमा गेल्या दोन दिवसांपासून शहरात दिसतोय. नाशिक महापालिकेची सत्ता मनसेच्या ताब्यात दोन वर्षापसून आहे मात्र मनसेचा कारभार समाधानकारक नसल्याने राज ठाकरे यांनी जमत नसेल तर राजीनामा द्या,  असं सुनावत जनतेची काम करा आणि अधिका-यांवर वचक ठेवा असे आदेश दिलेत.
राज ठाकरेंच्या या आदेशाचं पालन करताना मनसे पदाधिका-यांनी सुरु केलीय. स्वच्छता, आरोग्य संदर्भात पाहाणी केल्यानंतर दुस-या दिवशी महापौरांनी मुंबईनाका परीसारतील अतिक्रमणाची पाहाणी करून तत्काळ अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्यात.
 
मनसेच्या या धडाडीवर  विरोधकांनी हल्लाबोल केलाय. राज ठाकरेंना नाशिककरांची नाही तर नाशिककरांच्या मतांची चिंता आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर मनसे सक्रीय झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.  मनसेच्या आमदारांच वर्चस्व असणा-या भागातलं अतिक्रमण काढण्याचं धारिष्ट्य दाखवणार का असा सवालही विचारला जातोय.   

नाशिकच्या महापौरांनी यापूर्वीही `महापौर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला होता. मात्र हा ताफा प्रभागात पोहचलाच नाही. ज्या ठिकाणी महापौर अधिकारी पदाधिकारी जाऊन पोहचले त्या ठिकाणच्या समस्यांच अजूनही निराकरण झाला नाही. त्यामुळे ‘बुस्टर डोस’मुळे कामाला लागलेली मनसे किती दिवस याचं उत्साहानं  काम करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.