नाशिक मनपाचा `लाखमोला`चा नाश्ता

नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण पुढे करत शहरात विकासकाम ठप्प आहेत. ठेकेदारांची मागचीच बिल थकली असल्यानं नवीनं कामांना पैसा आणणार कुठून असा सवाल प्रशासन उपस्थित करत असतानाच चहापाणी, हारतुरे आणि नास्त्यावर लाखो रुपयांची उधळण होत असल्याचं समोर आलाय

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 19, 2013, 11:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक महानगर पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण पुढे करत शहरात विकासकाम ठप्प आहेत. ठेकेदारांची मागचीच बिल थकली असल्यानं नवीनं कामांना पैसा आणणार कुठून असा सवाल प्रशासन उपस्थित करत असतानाच चहापाणी, हारतुरे आणि नास्त्यावर लाखो रुपयांची उधळण होत असल्याचं समोर आलाय. शिवसेनेच्या काळात जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आता मनसेच्या काळातही दिसून येतेय.
फक्त नाश्त्यावर ३१ लाख ४ हजार ८१४ रुपयांचा खर्च
नाश्त्याची एक प्लेट तब्बल चारशे रुपये
चहापानासाठी ६६ लाखांचा खर्च
हार,गुच्छ आणि श्रीफळसाठी ३३ लाख
चक्रावून टाकणारे हे सगळे आकडे आहेत नाशिक महापालिकेचे... कारण इथले सगळे नेते आणि अधिकारी लाखमोलाचा नाश्ता करतात आणि लाखो रुपयांचा चहा पितात. एखाद्या फाईव्हस्टार हॉटेलच्या तोंडात मारेल, अशी ही नाश्त्याची बिलं झालीयत.
२००९-१० या वर्षात महासभेतल्या नाश्त्यासाठी ८ लाख ५६ हजार ७६४ रुपयांचा खर्च झाला. २०१०-११ वर्षात ३० महासभांसाठी १३ लाख ९३ हजार ५७४ रुपये तर २०११-१२ वर्षासाठी १७ लाख ४० हजार ९१५ रुपये नाश्त्यावर खर्च झाले. हे सगळे विक्रम मोडीत काढत २०१२-१३ या वर्षात तब्बल ३१ लाख ४ हजार ८१४ रुपयांचा नाश्ता करण्यात आलाय. साधारण अंदाज बांधला तर प्रत्येक प्लेट साडेतीनशे ते चारशे रुपयांना पडलीय.
महापालिकेतल्या नाश्त्यामध्ये साधारणपणे दोन सामोसा किंवा दोन कचोरी, तोंड गोड करण्यसाठी एखादी बर्फी किंवा सोहनपापडी असा ठरलेला मेनू असतो. मग एवढ्याशा प्लेटला साडे तीनशे ते चारशे रुपये कसे पडले. या नाश्त्यानं महापालिकेच्या नेत्यांबरोबर आणखी कुणाकुणाची पोटं भरली, असा सवाल विचारला जातोय.
हे झालं महासभेच्या खानावळीचं गणित.... ‘रामायण’ या महापौरांच्या निवासस्थानावरच्या चहापाण्याचा खर्चही लाखमोलाचा आहे. २०११ ते २०१३ या काळात तब्बल ६६ लाख ५८ हजार ३८७ रुपयांचा खर्च फक्त चहापाणी आणि नाश्त्यावर झालाय. तर सत्कार समारंभाच्या निमित्तानं देण्यात येणारे हार, गुच्छ, शाल आणि श्रीफळ यांच्यावरचा अडीच वर्षातला खर्च ३३ लाख रुपयांपर्यंत पोहोचलाय. या उधळपट्टीचा निषेध सुरु झाल्यानंतर स्थायी सभापतींनी स्वतःच्या खर्चातून पाहुण्यांना चहा द्यायला सुरुवात केलीय.
विशेष म्हणजे ज्या महासभा दिवंगतांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आल्या. अशा सभांमध्येसुद्धा नाश्त्यावर ताव मारण्याची संधी नगरसेवक आणि पदाधिका-यांनी सोडलेली नाही. एकीकडे तिजोरीत खडखडाट म्हणून विकासकामं थांबवायची आणि दुसरीकडे नाशिककरांच्या पैशांच्या जोरावर लाखमोलाचे नाश्ते हादडायचे, हे नक्कीच शोभणारं नाही.... आता तरी ही उधळपट्टी थांबवा, नाही तर लाखमोलाचा हा नाश्ता तुम्हांला सहज पचेल पण नाशिककर संतापले तर नाश्त्याचा हा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाहीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close