नितिन गडकरी-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर

Last Updated: Saturday, February 22, 2014 - 12:58

www.24taas.com, योगेश खरे, झी मीडिया, नाशिक
नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागणारे राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आज नाशिकमध्ये एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
गोदा पार्क विस्तारीकरणाच्या भूमिपूजनासाठी राज आणि गडकरी एकत्र येणार आहेत. त्यामुळं दोघेही काय बोलणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.

या विधानामुळे `दोस्त दोस्त ना रहा...` अशीच भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्था झाली असणार. कार्यकर्त्यांना प्रातःस्मरणीय असलेल्या नरेंद्रभाईंवरच थेट तोफ डागून राज ठाकरेंनी भावी राजकीय समीकरणांची झलक दाखवली खरी.
पण आता त्यातलं `मनसे` किती आणि राजकीय अपरिहार्यता किती अशा प्रश्न निर्माण झालाय... कारणही तसंच आहे.
नाशिकमध्ये गोदापार्क विस्तारीकरण भूमीपुजनाला इंजिन आणि कमळ एकत्र दिसणार आहेत... मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे वजनदार नेते, माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते हे भूमीपूजन होतंय.
नाशिकमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतः छगन भुजबळांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही, असं असलं, तरी ही उमेदवारी भुजबळ कुटुंबाकडेच राहणार हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरात राष्ट्रवादीनं जिल्ह्यात उद्घाटनांचा धडाका लावलाय.
भुजबळांनी आचारसंहितापूर्व प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे महायुती आणि मनसेच्या पोटात गोळा आलाय... या पार्श्वभूमीवर गोदापार्क विस्तारीकरण भूमीपूजनाला राज ठाकरे आणि गडकरींच्या उपस्थितीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.
आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणं बदलण्याइतकी ताकद या कार्यक्रमात आहे, असं काही जण मानतायत.
कदाचित हीच भीती राष्ट्रवादीच्या मनातही असावी... म्हणूनच या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्षेपाचा सूर लावलाय.
गोदापार्क राज ठाकरेंच्या नव्हेत तर आपल्या संकल्पनेतून पूर्ण झाल्याचा दावा माजी पहापौर दशरथ पाटील यांनी केलाय.
राज-गडकरींची ही व्यासपीठ सोबत आगामी काळात या दोन पक्षांना जवळ आणणार की हा कार्यक्रम म्हणजे केवळ औपचारिकता राहणार, हे आगामी काळात स्पष्ट होईलच.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 22, 2014 - 12:58
comments powered by Disqus