नाशिकला मंदीचा फटका, अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड

नाशिकची औद्योगिक वसाहत मंदीच्या फे-यात अडकत चालली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी २० ते २५ टक्के उत्पादनात घट झाली आहे. याचा थेट परिणाम कामगारांवर होतोय. हजारो कंत्राटी कामगारांच्या डोक्यावर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची भीती आहे.

जयवंत पाटील | Updated: Aug 12, 2013, 07:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकची औद्योगिक वसाहत मंदीच्या फे-यात अडकत चालली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी २० ते २५ टक्के उत्पादनात घट झाली आहे. याचा थेट परिणाम कामगारांवर होतोय. हजारो कंत्राटी कामगारांच्या डोक्यावर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची भीती आहे.
महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातलं नाशिक हे औद्योगिक प्रगतीचं उत्तम उदाहरण. पण आता नाशिकची हीच ओळख बदलणार की काय, अशी भीती वाटू लागलीय. इलेक्ट्रिक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रावरचे मंदीचे ढग गडद होत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन्ही क्षेत्रांमध्ये २० ते २५ टक्के उत्पादनात घट होताना दिसतेय. महिंद्रा अँड महिंद्रा बॉश सारख्या कंपन्यांनाही त्याचा फटका बसलाय. पेट्रोल, डिझेलचे दर महिन्याला वाढणारे भाव, विविध करांमुळे वाहनांच्या वाढत्या किमती अशा अनेक कारणांमुळे वाहनांची मागणी घटलीय.
औद्योगिक वसाहतीत मंदीचं सावट असल्यानं हजारो असंघटीत कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आलीय. मंदीचं मळभ दूर होत नाही, तोपर्यंत मोठ्या कंपन्यांनी वार्षिक नाफेखोरीतून कामगारांना वेतन द्यावं, अशी मागणी होतेय.

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची पत घसरल्याचा परिणामही औद्योगिक क्षेत्रावर जाणवू लागलाय. दिवाळी दस-याच्या काळात बाजारात तेजी असते. त्यासाठी आधीच दोन महिने कामगारांची मेहनत सुरू होते. पण यंदा कामगारांच्या हाताला कामच नाही. त्यामुळे पुढचे तीन महिने उद्योग क्षेत्रासाठी अत्य़ंत खडतर असणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.