पोलिसांची मोगलाई : चार पोलीस निलंबित

उस्मानाबादमधील कनगरा गावात दारूबंदीची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांना झालेल्या मारहाण प्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 28, 2014, 08:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, उस्मानाबाद
उस्मानाबादमधील कनगरा गावात दारूबंदीची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांना झालेल्या मारहाण प्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. एपीआय बनसोडे, हेड कॉन्स्टेबल पवार, कॉन्सटेबल भोसले आणि शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. नांदेडच्या आयजींचा अहवाल गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला. यात प्राथमिक चौकशीत पोलीस दोषी असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
दरम्यान, या पोलिसी अत्याचाराच्या घटनेची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी आज कनगरा ग्रामस्थांना भेट दिली. ग्रामस्थांना मारहाण करून त्यांची घरं उद्धवस्त करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विनोद तावडे यांनी केलीय. गावात चौकशीसाठी आलेल्या आयजींची गाडी संतप्त महिलांनी अडवली आणि आंदोलन करत ग्रामस्थांची सुटका करण्याची मागणी संतप्त महिलांनी केली, त्यामुळे आजही काही काळ गावात तणाव निर्माण झाला होता.
नेमकं काय घडलं होतं त्या रात्री...
उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा गावात सोमवारी मध्यरात्री मोगलाई अवतरली. पोलिसांनी घरांचे दरवाजे तोडले, ट्रक्टरच्या हेडलाईट्स फोडल्या. गावातल्या प्रत्येक घरात घुसून दिसेल त्या पुरुषाला अशी बेदम मारहाण केली. त्यांच्या अंगावरच्या वळ ही माराहाण किती जबरदस्त होती, हे सांगत होते. आता या मंडळींना खाली बसता येत नाही. काही जण आयुष्यात पुन्हा चालू शकतील की नाही अशी भीती आहे. हे सगळं घडलं ते महिला बचत गटानं गावातली अवैध दारु बंद करण्याची मागणी केली म्हणून...
बचत गटानं दारु पकडून दिल्यावर गावात अवतरलेल्या पोलिसांनी पकडलेली दारु पोलीस स्टेशनला न नेता थेट जमिनीवर फेकून दिली. ही दारू नाही पाणी आहे, असा बनाव सुरु केला. त्यातून महिला आणि पोलीस यांच्यात वाद झाला. पोलिसांनी महिलांना शिवीगाळ केली. ते बघून चिढलेल्या ग्रामस्थांनी या पोलिसांना मारलं. पोलीस अधिक्षक सचिन पाटलांना हे कळताच पाटील सगळा फौजफाटा घेवून गावात गेले आणि म्हणून मारहाण झाली असं पोलीस उप निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांनी म्हटलंय.
विशेष म्हणजे रात्री दहा वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत पोलीस ग्रामस्थांना मारत होते, असं ग्रामस्थांनी म्हटलंय. पोलीस अधिक्षक सचिन पाटील, उपाधिक्षक वैशाली कडुकरांनी कर्मचाऱ्यांना घराघरातून गावकऱ्यांना बाहेर काढून मारण्याचे आदेश दिले. या भयंकर घटनेचा गावातील चिमुरड्यांच्या मनावर प्रचंड आघात झालाय. अवघं गाव अजूनही रडत आहे. कुणाच्याही घरची चूल पेटलेली नाही... दहशतीनं काही जण फरार झालेत.
घटनेनंतर पोलिसांनी ५४ ग्रामस्थांना अटक करुन ग्रामस्थांवर पोलिसांच्या खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय. अवैध धंद्याची तक्रार करण्याऱ्या बचत गटाच्या महिलांनाही कोठडीत डांबलं आहे. या बाचाबाचीत तीन पोलीस जखमी झाले आहेत. प्रकरण चिघळण्याची शक्यता दिसताच. प्रसार माध्यांना ग्रामस्थांना भेटण्यास मज्जाव केला जावू लागलाय. कनगरा गावातल्या महिला एक वर्षापासून गावातली दारु बंद करण्याची मागणी करत होत्या. शेवटी स्वत: पुढाकार घेऊन दारु बंदीचा प्रयत्न केल्याची गावाला अशी शिक्षा मिळाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.