वडिलांनीच फेकले गोदावरी नदीत ६ वर्षांच्या मुलीला

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, November 20, 2013 - 11:42

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमधून धक्कादायक बातमी. नाशिकमध्ये वडिलांनीच आपल्या ६ वर्षांच्या मुलीला गोदावरी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. तब्बल २ महिन्यांनी ही घटना उघडकीस आलीय. त्या मुलीचा गुन्हा फक्त एवढाच की ती मुलगी जन्मतःच अंध होती.
कांबळे कुटुंब मूळचे यवतमाळ जिल्ह्यातले. मात्र आता नाशिकच्या माडसांगवी गावात हे कुंटुंब राहत आहे. या कुटंबातील सहा वर्षांची मुलगी आणि तिच्या माऊलीची दोन महिन्यांपूर्वी ताटातूट झाली ती कायमचीच. आणि त्याला जबाबदार ठरलाय तो तिचाच पती. कैलास कांबळे.
गणेशोत्सवादरम्यान कांबळे कुटुंबीय सावर्जनिक गणेशोत्सव बघण्यासाठी नाशिकला आले. पंचवटी परिसरात फिरता फिरता वै-याच्याही मनात येणार नाही, इतकं भयानक कृत्य या मुलीच्याच बापानं केलं. त्यानं ६ वर्षांच्या मुलीला चक्क गोदावरी नदीच्या पात्रात टाकून दिलं.
६ वर्षांच्या सानिका उर्फ छकुलीला नाशिकच्या अंधशाळेत ठेवलंय, अशी बतावणी त्यानं घरी केली. अखेर घरच्या मंडळींना संशय आला आणि त्यांनी सगळीकडे सानिकाचा शोध घेतला. मात्र सानिकाचा पत्ता न लागल्यानं अखेर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
तक्रार मिळल्यानंतर पोलिसानी त्यांच्या पद्धतीनं शोध घेतला. मात्र संशयाची सुई मुलीच्या जन्म्दात्याकडेच येऊन पोहोचली. आणि समोर आलेल्या सत्यामुळे पोलीसही हबकून गेले. सहा वर्षांची छकुली अंध आणि थोडी विकलांग होती या एकमेव कारणामुळे कैलासनं स्वतःच्याच मुलीला गोदावरी नदीच्या पात्रात टाकून दिलं.
अंगावर शहारे आणणारी ही घटना. मुळातच विधात्यानं तिला दृष्टी नाकारुन तिच्यावर अन्याय केला होता. आता सख्या वडिलांनीच तिचा जीव घेऊन तिचा जगण्याचा अधिकारही हिरावून घेतला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, November 20, 2013 - 11:37
comments powered by Disqus