जनतेकडूनही आहेत मनसेला अपेक्षा - राज ठाकरे

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, June 24, 2013 - 13:24

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी ते पत्रकारांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी नाशिकच्या विकासासाठी मनसे कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार केलाय.
नाशिक पालिकेच्या संथ कारभारावर विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली. तसंच नगरसेवकांची भेट घेऊन त्यांची झाडाझडतीही घेतली. नागरिकांची कामं वेळच्यावेळी होण्यासाठी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय. पण, ‘ज्याप्रमाणे जनतेच्या मनसेकडून अपेक्षा आहेत त्याचप्रमाणे मनसेच्याही जनतेकडून काही अपेक्षा आहेत’ असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय.

नाशिक महापालिकेनं शहरात अवैध बांधकामं पाडण्याचा सपाटा लावलाय. त्यावर आयुक्तांना आदेश देताना ‘अतिक्रमण तोडताना मनसेचे नेतेही समोर आले तरी थांबू नका’ असा सल्ला राज ठाकरे यांनी दिलाय.
दरम्यान, हेमंत गोडसे यांनी केलेले आरोप निराधार आहेत असंही त्यांनी म्हटलंय. हेमंत गोडसे यांनी नुकताच मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकारींवर आरोप केले होते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 24, 2013 - 13:24
comments powered by Disqus