पुण्यातही नाट्य परिषद निवडणूक रद्द करण्याची मागणी

नाट्य परिषदेची मुंबई विभागाची निवडणूक रद्द झाल्यानंतर आता पुणे विभागातही निवडणूक रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. मुंबई विभागाच्या निवडणूक वादावर पडदा पडत नाही तोपर्यंत पुण्यात हा नवा अंक सुरु झाला आहे. पुणे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप पराभूत झालेल्या उमेदवारांनी केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 20, 2013, 05:28 PM IST

www.24taas.com, पुणे
नाट्य परिषदेची मुंबई विभागाची निवडणूक रद्द झाल्यानंतर आता पुणे विभागातही निवडणूक रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. मुंबई विभागाच्या निवडणूक वादावर पडदा पडत नाही तोपर्यंत पुण्यात हा नवा अंक सुरु झाला आहे. पुणे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप पराभूत झालेल्या उमेदवारांनी केला आहे.
राज्य नाट्य परिषदेच्या मुंबई विभागापाठोपाठ पुणे विभागाची निवडणुकही वादात सापडली आहे. पुण्यातल्या मतदान प्रक्रियेतही घोळ झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला आहे. अनेक मतदारांपर्यंत मतदानपत्रिका पोहचल्या नाहीत तसंच अनेक मतदारांनी मतदान केलेलं नाही. तरीही 90 टक्क्यांहून अधिक मतदान झालंय. त्यामुळं निवडणूक प्रक्रियेत काळंबेरं झाल्याचा संशय पराभूत उमेदवारांनी व्यक्त केला असून निवडणूक रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दुसरीकडं विजयी उमेदवारांनी मात्र परत निवडणूक घेण्याच्या मागणीची खिल्ली उडवलीय. निवडणूक प्रक्रिया होण्यापूर्वी ही मागणी योग्य होती. पण आता या मागणीला काहीच अर्थ नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

नाट्य परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या तमाशामुळं चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यामुळे यामध्ये आणखी किती रंग भरले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.