बोगस आधारकार्ड मिळवा!

सरकारच्या अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से आजवर आपण ऐकले आहेत. असाच एक किस्सा औरंगाबादमध्येही घडलाय. भारत सरकारच्या महत्वाकांक्षी आधार योजनेचं कार्ड सहा वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एका महिलेला घरपोच मिळालयं.

Updated: May 20, 2012, 05:11 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद

 

सरकारच्या अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से आजवर आपण ऐकले आहेत. असाच एक किस्सा औरंगाबादमध्येही घडलाय. भारत सरकारच्या महत्वाकांक्षी आधार योजनेचं कार्ड सहा वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एका महिलेला घरपोच मिळालयं.

 

भारत सरकारनं मोठा गाजावाजा करत 29 सप्टेंबर 2010 रोजी भारत सरकारनं आधारकार्ड योजना सुरू केली. मात्र, या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्रं दिसतंय. औरंगाबादच्या पंचकुवा भागात राहणाऱ्या साळूबाई तेजाळे या महिलेचा सहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. असं असताना सरकार दरबारी त्या आजही जिवंत आहेत. साळूबाईंच्या नावाचं आधारकार्ड त्यांच्या कुटुंबियांना घरपोच मिळालयं. हे कार्ड पाहताच कुटुंबियांना धक्काच बसला. या कार्डावर नाव, पत्ता आणि इतर माहिती तंतोतंत खरी असली तरी फोटो मात्र दुसऱ्याच महिलेचा आहे.

 

मुळात आधारकार्ड काढण्यासाठी त्या नागरिकाची उपस्थिती आवश्यक आहे. हातांचे ठसे, डोळ्यांचं स्कॅनिंग केल्यानंतर संबंधित व्यक्तीला आधारकार्ड दिलं जातं. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी मरण पावलेल्या साळूबाईंच्या नावानं आधारकार्ड तयार झालंच कसं? हा प्रश्न निर्माण झालाय. सरकारी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळं आता रेशनकार्डाप्रमाणे आधारकार्डही बोगस बनवले जाऊ शकतात, हेच या घटनेतून स्पष्ट होतंय.