भंगारातून बनवलं हेलिकॉप्टर... - Marathi News 24taas.com

भंगारातून बनवलं हेलिकॉप्टर...

www.24taas.com, सांगली 
 
सांगलीतल्या प्रदीप मोहिते या २८ वर्षीय युवकानं भंगाराच्या वस्तूंमधून हेलिकॉप्टर तयार केलंय. सध्या हे हेलिकॉप्टर चार फूट उंच उडतं. त्याला मदतीचा हात मिळाल्यास त्याचं हेलिकॉप्टर भरारी घेऊ शकेल.
 
उदरनिर्वाहासाठी गॅरेजकाम करणाऱ्या सांगलीच्या प्रदीप मोहिते यानं चक्क भंगारातून हेलिकॉप्टर बनवलंय. सध्या हे चार फुटांपर्यंत उडते. वेगळे काही करायच्या जिद्दीतून प्रदीप नवे प्रयोग करु लागला. त्यातच थ्री इडियट हा चित्रपट पाहून त्याला हेलिकॉप्टर तयार करायची कल्पना सुचली. दिवसभर गॅरेजमध्ये काम करुन मिळणाऱ्या पैशातून त्यानं साहित्याची जमवाजमव केली. लोखंडी पाईप, पत्रा आणि इतर साहित्य खरेदी करून त्याचं हेलिकॉप्टर आकाराला आलं. आतापर्यंत त्याला अडीच लाख रुपये खर्च आला असून आणखी दीड ते दोन लाख रुपयांची गरज आहे.
 
प्रदीपनं तयार केलेल्या हेलिकॉप्टरचं वजन ४८० किलो असून एका तासाला त्याला दोन लिटर पेट्रोल लागतं. जिल्ह्यातल्या उद्योजक आणि संस्थांनी मदत केली तर त्याचं हेलिकॉप्टर मोठी भरारी घेईल.
 
 
 

First Published: Saturday, July 07, 2012, 23:55


comments powered by Disqus