भूकंपाची टांगती तलवार.... - Marathi News 24taas.com

भूकंपाची टांगती तलवार....

www.24taas.com, मुंबई
 
पुन्हा थरारली धरती !
भूकंपाने  हादरलं इंडोनेशिया !
त्सुनामीच्या भीतीने गारठले २८ देश !
काय दडलंय पृथ्वीच्या पोटात ?
भूकंपाची टांगती तलवार
 
भूकंप या एका शब्दातच सगळं काही दडलंय. निसर्गाचं हे  एक अक्राळ विक्राळ असं रुप आहे. भूकंपापुढं  धरतीही  थरारल्या शिवाय राहात नाही. हेच रुप इंडोनेशियातील नागरिकांना बुधवारी दुपारी पुन्हा एकदा पहायला मिळालंय. भूकंपाच्या धक्क्यांमुळे  बुधवारी इंडोनेशिया  अक्षरश: हादरुन गेला. त्या भूकंपाची तीव्रता ८.७ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे धक्के बसताच  इंडोनेशियातील  नागरिक रस्त्यावर आले. घर, कार्यालय, मॉल्समधून लोक जीव वाचविण्यासाठी बाहेर पळत सुटले होते. भेदरलेल्या अवस्थेत लोक रस्त्यावर  आले होते.
 
प्रत्येकाला आपल्या आप्तस्वकियांची चिंता सतावत होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भूकंपाची भीती दिसत होती. भूकंपामुळे संपूर्ण इंडोनेशियात जणू आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. या भूकंपाचा केंद्र बिंदू असेह प्रांताची राजधानी बांदापासून ४९५ किलोमीटरवर समुद्रात ३३ किलोमीटर खोलीवर होता. हा भूकंप बँकॉकमध्येही जाणवला. तिथंही लोक रस्त्यावर आले होते. भूकंपानंतर सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच  भारत, श्रीलंका, म्यानमार, थाईलँड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, सिंगापूर, मलेशिया, मालदीव, इराण, बांग्लादेश, येमन, युनायटेड किंगडम या देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. कारण या भूकंपामुळे सुनामीची भीती व्यक्त केली जात होती.
 
समुद्र किनाऱ्यावर असलेल्या भारतातील शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. इंडोनिशेयापासून जवळच असलेल्या अंदमान निकोबार बेटांवरही सुनामीचा इशारा देण्यात आला होता. कारण २००४ मध्ये आलेल्या सुनामीमुळे अंदमान निकोबारला मोठा तडाखा बसला होता. त्यामुळे बुधवारी इंडोनेशियात भूकंप झाल्याचं समजताच या परिसरातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. इंडोनेशियात भूकंप येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही इथ भूकंपाने अनेक धक्के दिले आहेत. कारण फॉल्टलाईनच्या मुखावर इंडोनेशिया वसलेलं आहे. त्यामुळे हा भूभाग कायमच ज्वालामुखी आणि भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो आहे.
 

अनेक बेटांचा मिळून इंडोनेशिया एक देश बनला आहे. इंडोनेशियात यापूर्वी डिसेंबर २००४ मध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता ९.१ रिश्टर स्केल इतकी होती. त्या भूकंपात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली होती. बुधवारी आलेल्या या भूकंपामुळे पुन्हा एकदा इंडोनेशियाला हादरा दिला आहे. इंडोनिशेयात आलेल्या भूकंपाचे धक्के भारतातही जाणवले आहेत. विशेषता पश्चिम बंगाल, बिहार, तमिळनाडू, ओरीसा या राज्यातील लोकांनी त्या झटक्यांचा अनुभव घेतला आहे. भारताला त्सुनामीचा धोका नसला तरी भूकंपाची टांगती तलवार कायम आहे. इंडोनेशियात भूकंप झाला असला तरी  त्याचे झटके मात्र भारतातही जाणवले. पश्चिम बंगाल, बिहार, तमिळनाडू, ओरीसा या राज्यात  भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक रस्त्यावर आले होते.
 
भूकंपामुळे काही ठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत. भारतात त्याची तीव्रता कमी असली तरी नागरिंकमध्ये मोठी घबराट पसरली होती. सुनामी येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. तसा इशाराही देण्यात आला होता. विशेषत: पूर्व समुद्र किनार पट्टीवरील रहिवाशांसाठी रेड अलर्ट जारी  करण्यात आला होता. मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. मुंबईतही भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा नागरिकांनी केला. मात्र हवामान खात्याच्या विभागाने तो दावा फेटाळून लावला आहे. गोव्यात मात्र भूकंपाचे धक्के जाणवले असून  मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा  इशारा देण्यात आला. गोवा हा पश्चिम किनार पट्टीवर असल्यामुळं पूर्व किनार पट्टीच्या तुलनेत या परिसराला कमी धोका असल्याचं भूगर्भ शास्त्रज्ञांच म्हणणं आहे. गोव्या प्रमाणेच चेन्नईतही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
 

इथंही लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. विशेषत समुद्र किनाऱ्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून किनाऱ्यावर पोलीस तैनात करण्य़ात आले होते. त्सुनामीचा इशारा दिल्यानंतर नागरिकांनी काही सूचनांचं पालन करण्याची आवश्यकता असते. गरज असेल तरच समुद्र किनाऱ्या लागत जावे. तुम्ही समुद्राच्या आसपास  असाल तर तेथून तातडीने घरी जा. त्सुनामीचा इशारा देण्यात आलेल्या परिसरात रहिवासी असलेल्या नागरिकांनी तेथून स्थलांतर करावं. त्या काळात नदी किंवा तलावा जवळ जाऊ नका. तसेच समुद्रापासून उंच ठिकाणावर जाण्य़ाचा प्रयत्न करा. या काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्सुनामीपासून तुमचं संरक्षण होईल. बुधवारी इंडोनेशियात आलेला हा भूकंप भूगर्भ तज्ज्ञांना अपेक्षित होता.
इंडोनेशियानंतर  आगामी काळात रशियात मोठ्या प्रमाणात भूकंप येण्याची शक्यता भूगर्भ अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. मुंबईवरही भूकंपाची टांगती तलवार असल्याचं भूगर्भ तज्ज्ञांचं म्हणनं आहे. इंडोनेशियातील भूकंपामुळं भारताच्या पूर्व किनाऱ्यावर त्सुनामीचा धोका संभवतो. यावेळीही तीच भीती व्यक्त केली  जात होती. मात्र ती फोल ठरली. ११ मार्च २०११ रोजी जपानने पाहिल निसर्गांच रौद्ररूप जपानच्या प्रमाणवेळे नुसार २.४६ मिनीटांनी आलेल्या मोठ्या भूकंपाने आणि त्यानंतर उसळेलेल्या त्सुनामीने जपानसारख्या कायम भूकंपाच्या तयारीत असेलला देशही हादरला त्याला कारण होत भूकंप-त्सुनामीची तीव्रता आणि त्याचा जपानच्या अणुभट्ट्यांना बसलेला फटका.
 
११ मार्च २०११ची दुपार जपानचे नागरिक कधीच विसरु शकणार नाहीत. कारण याच दिवशी जपानला ८.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर समुद्राचं अक्राळ विक्राळ रुप जपानी नागरिकांना पहायला मिळालं. जपानच्या  किनारपट्टीवर त्सुनामीच्या भिमकाय लाटा येवून थडकल्या. जपानच्या समुद्र किनाऱ्यापासुन सुमारे १२५ कि.मी. अंतरावर समुद्रात १० कि.मी.खोलवर हा भूकंप झाला होता. त्सुनामीच्या या लाटा किनाऱ्यापासुन कित्येक मैल आत शिरल्याने किनारपट्टीलगतची शहर आणि गांव पूर्णपणे उध्वस्त झाली. त्या राक्षसी लाटांनी हजारो बळी घेतले, ४० लाख घरे नष्ट केली. वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे मेट्रो आणि विमानसेवा विस्कळीत झाली. या विध्वसांचा फटका जपानच्या किनारपट्टीवरच्या फुकूशिमा अणुभट्ट्यानांही बसला आणि अवघ जग हादरलं.
 

अणुभट्टीतील रियॅक्टर बंद पडल्यामुळे कॉक्रींटीकरण केलेल्या भागाला भेगा पडून किरणोत्सर्गाला सुरूवात झाली. संपूर्ण जपानमध्ये हाहाकार उडाला असतांना हे नवं संकट समोर आलं होतं. त्सुनामीच्या तडाख्यामुळं जपानला मोठं नुकसान सोसावं लागलं. मात्र एका वर्षानंतर जपान त्यातून सावरला. २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीचा फटका भारतालाही बसला होता. त्यावेळी वेळी दक्षिणेच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी तसेच मालमत्तेचं नुकसानं झालं होतं. १९९३ साली लातूर जिल्ह्याच्या किल्लारीत आलेल्या भूकंपाने तर देशाला हादरवून सोडलं होतं. पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना भूकंपाने गाठलं होतं. त्या भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपात जवळपास आठ हजार लोक मृत्यूमुखी पडले. तर सोळा हजाराहून अधिक लोक जखमी झाले.
 
भूकंपाने तीस हजार घरे जमिनदोस्त केली. गेल्या काही वर्षात भारतात भूकंपाच्या घटना पाहाता आपत्ती व्यवस्थापनासाठी विभाग तयार करण्यात आला आहे. मात्र आपत्ती येण्यापूर्वीचं व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असल्याचं जाणकारांना वाटतंयय. आज भूकंप आणि त्सुनामीवर चर्चा होत असली तरी भारतात १८८३ साली त्सुनामी थडकल्या नोंद आहे. १९४५ साली कांडला बंदरात  त्सुनामीने तांडव केलं होतं. इंडोनेशियात आलेला भूकंप पहाता भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीपासून  मनुष्य तसेच वित्तहानी टाळण्यासाठी सरकारने अधिक गंभीरपणे पावलं उचलण्याची आवश्यकता आहे.
 
 
 
 

First Published: Wednesday, April 11, 2012, 23:14


comments powered by Disqus