शिवसेना @ 46 - Marathi News 24taas.com

शिवसेना @ 46

www.24taas.com, मुंबई
 
शिवसेनेच्या स्थापनेला आज ४६ वर्षं झाली. शिवसेनेला स्थापनेपासून संघर्ष करावा लागतोय. प्रत्येक राजकीय वादळात शिवसेना संपेल अशा वावड्या नेहमीच विरोधकांकडून उठवण्यात आल्या.. पण दरवेळी सर्व प्रश्नांना एकच उत्तर पुरेसे ठरते.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे..
 
1966 पासून शिवसेनेची वाटचाल दिमाखदार अशीच सुरु आहे. शिवसेनेची स्थापना जरी 1966ची असली तरी 1956 पासून मराठी अस्मितेचे वादळ मुंबईत घोंघावायला सुरुवात झाली होती. शिवसेनेनं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून मराठी माणसाचा खुबीने वापर करण्यास जी सुरुवात केलीय ती, आजतागायत..
 
मराठी अस्मितेच्या मुद्यावर 1966 मध्ये शिवसेनेची स्थापन झाली. सुरूवातीच्या काळात सामाजिक संघटना असलेली शिवसेना नंतर राजकारणाच्या आखाड्यात उतरली. सुरवातीला मराठी अस्मिता आणि त्यानंतर हिंदुत्वाचा पुरस्कार करुन शिवसेना महाराष्ट्रात फोफावली. या 46 वर्षांच्या प्रवासात शिवसेनेनं अनेक चढउतार पाहिले. 1967 साली शिवसेनेचा भगवा ठाणे महापालिकेवर फडकला. तर 1968 मध्ये मुंबई महापलिकेत प्रवेश केला. त्या निवडणुकीत मराठीच्या घोषणा हे शिवसेनेचं वैशिष्ट होतं. “शिवरायांची शपथ तुम्हाला, विजयी करा शिवसेनेला”, “असशील खरा मराठी, तर राहशील शिवसेनेच्या पाठिशी”, “थांब लक्ष्मी कुंकु लाविते, शिवेसनेला मतदान करुन येते”, “झाला महार पंढरीनाथ, मारा देशद्रोह्यांना लाथ” अशा घोषणांनी मराठी मुद्याला आणि भावनेला हात घालत मराठी माणसाच्या हृदयात घुसण्याचा शिवसेनेनं प्रयत्न केला. मुंबई महाराष्ट्रात आल्यानंतरही मराठी माणसाच्या एकजुटीचा शिवसेनेनं अशा प्रकारे खुबीनं वापर करुन घेतला आणि शिवसेना वाढत गेली. शिवेसनेनं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली आणि शिवसेनाही मोठी झाली.
 
मुंबई महापालिकेत 1968 साली प्रवेश केलेल्या शिवसेनेनं 1974-75 साली मुंबई महापालिकेत सत्ता मिळवली. 1969 मधलं सीमा आंदोलन, त्यानंतर शेतक-यांच्या कर्जमुक्तीच्या प्रश्नावर मुंबईसह राज्यभर काढलेले मोर्चे, मुंबईतील इंग्रजी पाट्यांवर डांबर फासण्याचा कार्यक्रम आणि महत्वाचं म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला शिवसेनेनं केलेला विरोध, बाबरी मशीद प्रकरणी शिवसेनेनं घेतलेली भूमिका यामुळं शिवसेना राज्यभर फोफावली. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेनं भाजपशी युती केली. याच युतीनं 1995 मध्ये सत्ता मिळवली. मात्र केवळ साडेचार वर्षच युतीला सत्ता चाखता आली.

 
1999 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडून शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापन केली. या फुटीचाही शिवसेना भाजपला फायदा उठवता आला नाही. आणि एकमेकांच्या विरोधात लढणा-या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. मधल्या काळात अनेक नेते शिवसेनला सोडून गेले. 1991 मध्ये छगन भुजबळांनी काही आमदारांसह शिवसेनेला खिंडार पाडलं. मात्र तरीही 1995 मध्ये शिवसेना भाजपच्या मदतीनं सत्तेवर आली. त्यानंतर 2005 मध्ये  नारायण राणे आणि ठाकरे कुटुंबातले राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. बाळासाहेबानंतर आता शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे यांच्याकडं गेलीत. तर त्यांचे पुत्र आदित्य ठाकरेंच्या रुपानं ठाकरेंची तिसरी पिढी शिवसेनचा वारसा पुढे चालवण्यास सज्ज झाली आहे.
 
मराठी अस्मितेच्या मुद्यावर 1966 साली स्थापन झालेल्या शिवसेनेनं नंतर हिंदुत्वाचा पुरस्कार केला. कट्टर हिंदुत्ववादी आणि प्रांतवादी असणा-या शिवसेनेनं सत्तेवर येण्यासाठी मात्र अनेकवेळा कट्टर विरोधी विचारसरणीच्या पक्षांची हातमिळवणी केलेली दिसून येते. 1974-75 साली मुंबई महापालिकेत सत्तेवर येण्यासाठी शिवसेनेनं ‘मुस्लिम लीग’ची मदत घेतली. मुस्लिम लीगच्या मदतीनं शिवसेनेचे सुधीर जोशी मुंबईचे महापौर झाले होते. तर मुस्लिम लीगचा उपमहापौर झाला होता. औरंगाबादमध्ये 1988-89 मध्ये महापालिकेची पहिली निवडणूक झाली होती. त्यामध्येही शिवसेना सर्वात मोठा पक्ष निर्माण झाला होता. त्यावेळी शिवसेनेनं पाठिंबा दिलेले अपक्ष मोरेश्वर सावे मुस्लिम लीग आणि अपक्षांच्या मदतीनं महापौर झाले. तर मुस्लिम लीगचा उपमहापौर झाला होता. पुढे मोरेश्वर सावे शिवसेनेचे खासदार झाले. नांदेडमध्येही तोच प्रकार पहायला मिळतो. नांदेड वाघाळा महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही. मात्र शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनला. तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे 11 सदस्य निवडून आले होते. त्यामध्ये 10 सदस्य मुस्लिम होते. शिवसेनेनं धर्मनिरपेक्षा जनता दलाशी युती करुन सत्ता मिळवली. या तीनही ठिकाणी मुस्लिम लिग असो किंवा जनता दल असो त्यांचा आज पुरता सफाया झाला. मात्र या युतीचा शिवसेनेवर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. उलट शिवसेना वाढतच गेली.
 
आणीबाणीच्यावेळी देशभर इंदिरा गांधी यांच्या विरोधात जनक्षोभ उसळला होता. अशा परिस्थितीत शिवसेनेनं इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. आजही ठाणे महापालिकेत सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेसची दोस्ती केली. राज्यात काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठे उघडपणे तर कुठे छुप्या पद्धतीनं काँग्रेसची संधान बांधलेलं आहे. अलिकडचं उदाहरण द्यायचं झालं शिवसेननं रामदास आठवले यांच्या आरपीआयशी केलेली युती. ज्या विचारधारेवर शिवसेना मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात फोफावली त्याच्या अगदी विपरीत भुमिका घेत शिवसेनेनं आरपीआयशी युती केलीय. या युतीचा शिवसेनेला मुंबई आणि ठाणे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी फायदा झाला. मात्र आरपीआयची पुरती वाताहात झाली. आजपर्यंतचा इतिसाह पाहिला तर अशा विरुद्ध विचारसरणीच्या पक्षासोबतच्या युतीचा शिवसेनाला फायदाच झालेला आहे. शिवसेना भीमशक्तीचाही काही प्रमाणात तरी फायदा झाला. यापुढे कसा होईल ते पहावं लागेल.
 
 

First Published: Tuesday, June 19, 2012, 23:36


comments powered by Disqus